Income Tax Refund Scam In India 2026: आयकर परताव्यास (IT Return) होत असलेला विलंब आणि त्यासंबंधित उलटसुलट चर्चांमुळे सायबर चोरटे करदात्यांच्या परताव्याच्या निकडीचा फायदा घेत आहेत. ते बनावट ईमेल, फोन कॉल आणि एसएमएसद्वारे आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत करदात्यांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी करदात्यांना सतर्क केले आहे. त्यांनी करदात्यांना ओटीपी किंवा बँक तपशील कोणाशीही शेअर करू नये असे आवाहन केले आहे.

आयकर विभागाने उघड केले आहे की या फसव्या संदेशांमध्ये अनेकदा किरकोळ स्पेलिंगच्या चुका असतात आणि खरे वाटावे यासाठी तयार केलेल्या बनावट लिंक्स असतात. करदात्यांनी त्यावर क्लिक केल्यास हे सायबर चोरटे ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फसवणूक आणि संवेदनशील माहितीचा गैरवापर करू शकतात, असे आयकर विभागाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयकर विभागाने नागरिकांना त्यांच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometax.gov.in वरूनच कराशी संबंधित सर्व माहिती पडताळण्याचे आवाहन केले आहे आणि परताव्याच्या अपडेट्सचा दावा करणाऱ्या ईमेल, एसएमएस किंवा सोशल मीडियाद्वारे येणाऱ्या लिंक्सवर क्लिक करणे टाळावे, असे सांगितले आहे.

आयकर विभागाच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बनावट संदेशांमध्ये परतावा (रिफंड) मिळणार असल्याचा दावा केला जाऊ शकतो किंवा तातडीची कारवाई करण्यास सांगितले जाऊ शकते आणि त्यासाठी एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाऊ शकते. अशा फसवणुकीला बळी पडू नका. कधीही तुमचा ओटीपी किंवा बँकेची माहिती शेअर करू नका.”

याचबरोबर आयकर विभागाने करदात्यांना अधिकृत संकेतस्थळावर संदेशांची पडताळणी करण्यास सांगितले आहे. तसेच संशयास्पद संदेशांची माहिती webmanager@incometax.gov.in या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन केले आहे.

आयटी रिटर्न फ्रॉड कसा केला जातो?

कर परताव्याची (रिफंड) वाट पाहत असलेल्या करदात्यांना हे सायबर चोरटे कसे लक्ष्य करतात, याबाबत आयकर विभागाने माहिती दिली आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांकडून करदात्यांना संदेश पाठवले जातात, ज्यामध्ये त्यांचा आयकर परतावा विलंबित आहे किंवा अपूर्ण आहे, असा दावा केला जातो.

या संदेशांमध्ये ‘तात्काळ कारवाई आवश्यक’, ‘परतावा प्रलंबित’ किंवा ‘पडताळणी न केल्यास दंड’ अशा घाबरवणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. तसेच संदेशामध्ये एका लिंकचा समावेश असतो, ज्यावर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते.

युजरने लिंकवर क्लिक केल्यास ती त्यांना मूळ आयकर वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइटवर घेऊन जाते. पीडितांना वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील, पॅन क्रमांक आणि ओटीपी भरण्याची विनंती केली जाते आणि त्यानंतर त्यांची फसवणूक होते, असे आयकर विभागाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.