नवी दिल्ली : कर मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या ७.८ कोटी या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिली. यंदा विवरणपत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेला करदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गेल्या वर्षी मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी १६ सप्टेंबर २०२५ या वाढीव अंतिम मुदतीपर्यंत ७.३ कोटींहून अधिक कर विवरणपत्रे दाखल झाली होती. त्या तुलनेत यंदा ३१ ऑगस्टपर्यंत दाखल झालेल्या विवरणपत्रांची संख्या ७.८ कोटींच्या पुढे गेली आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी विवरणपत्र दाखल करण्याच्या ३१ जुलै या अंतिम मुदतीपर्यंत यंदा ५.९ कोटींहून अधिक विवरणपत्रे आयटीआर-१ आणि आयटीआर-२ नमुन्यात दाखल झाली आहेत.

व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही, अशा करदात्यांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ ही विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या गटातील करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपानुसार आयटीआर-३, आयटीआर-४, आयटीआर-५ किंवा आयटीआर-७ यापैकी लागू नमुन्यात विवरणपत्र दाखल करावे लागते.

कोणासाठी कोणता आयटीआर?

आयटीआर-३ हा स्वतःचा व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती तसेच हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी (एचयूएफ) लागू होतो.

आयटीआर-४ हा तुलनेने सोपा विवरणपत्राचा प्रकार असून छोट्या आणि मध्यम करदात्यांसाठी त्याचा वापर केला जातो. आयटीआर-५ हा फर्म, मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) आणि सहकारी संस्थांसाठी लागू आहे. तर कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपन्यांसाठी आयटीआर-६ आणि ट्रस्ट तसेच धर्मादाय संस्थांसाठी आयटीआर-७ वापरला जातो.