ITR filing FY2023-24: आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर भरण्याची शेवटची मुदत आज (दि. ३१ जुलै) संपत आहे. आयकर विभागाने ही मुदत वाढविली असल्याची कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर ३१ जुलैच्या मुदतीमध्ये वाढ केल्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावर काही लोकांकडून मुदत वाढविल्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आता आयकर विभागाने यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेक या एक्स अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट करण्यात आली आहे. जी आयकर विभागानेही शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटले की, प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती चुकीची आणि खोडसाळ आहे. प्राप्तीकर भरण्याची मुदत वाढविण्यात आलेली नाही. हे वाचा >> प्राप्तिकर कायदा म्हणजे नेमका काय? करदात्याचे किती प्रकार असतात? ३१ जुलैपूर्वी प्राप्तीकर भरण्यात अनेकांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्राप्तीकर भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, असा दबाव सोशल मीडियावरून वाढत आहे. सोशल मीडियावर मुदतवाढीची अफवा पसरत असल्यामुळे करदाते कदाचित ३१ जुलैपूर्वी कर भरण्यास टाळाटाळ करू शकतात, त्यामुळे आयकर विभागाने या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आयकर विभाग ३१ जुलै याच मुदतीवर ठाम राहिल्यामुळे आता करदात्यांना कर भरण्याची आजची शेवटची मुदत आहे. आजची मुदत उलटल्यानंतर त्यांना दंडासह कर भरावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, आयकर विभागाने याआधीही कर भरण्याची मुदत वाढविली आहे. मात्र ती अपवादात्मक परिस्थितीत वाढविली जाते. मुदतवाढ मिळेलच, याची श्वाशती नाही. सिंघानिया अँड कंपनीच्या भागीदार रितिका नायर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, शेवटची मुदत जवळ येताच अनेकांकडून मुदतवाढीची मागणी केली जाते. तांत्रिक अडचणी आल्यामुळे अनेकांना वेळेवर कर भरणे शक्य होत नाही. त्यामुळे मुदत वाढ मागितली जाते. आयकर विभागाकडून करदात्यांना कर भरण्यासाठी वारंवार सूचित करण्यात येत असते. त्याबद्दल जाहिरातीही करण्यात येतात, त्यामुळे मुदतवाढ मिळेल, याची शक्यता कमीच आहे.