ITR Filing Last Date 31 July 2026 : प्राप्तीकर परतावा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ असल्यामुळे आज करदात्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. अखेरच्या दिवशी आयटीआर भरणाऱ्या करदात्यांच्या मनात एक भीती असते की माझं ई-व्हेरिफिकेशन होईल का? तुम्ही आज शेवटच्या क्षणी आयटीआर अपलोड केला असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण प्राप्तीकर विभागाने करदात्यांना ‘३० दिवसांच्या ई-वेरिफिकेशन’चा एक अतिशय महत्त्वाचा दिलासा दिला आहे.
आयटीआर अपलोड केला म्हणजे काम संपलं असं नाही
पहिल्यांदाच आयटीआर भरत असलेल्या करदात्यांना वाटतं की एकदा प्राप्तिकर परतावा भरला म्हणजे आपलं काम संपलं. तुम्ही अपलोड केलेला आयटीआर वेळेत व्हेरीफाय (सत्यापित) करणे तितकेच गरजेचे असते. जर तुम्ही आयटीआर वेळेत व्हेरीफाय केला नाही, तर प्राप्तीकर विभाग तो रिटर्न भरलाच नाही असे मानतो.
३० दिवसांचा ई-व्हेरिफिकेशन नियम?
जर एखाद्या करदात्याने ३१ जुलै रोजी आपला आयटीआर ऑनलाईन अपलोड केला, आणि त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत त्याचे ई-वेरिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले, तर तो आयटीआर ३१ जुलै रोजीच भरला गेल्याचे मानले जाईल. म्हणजेच, जर तुम्ही आज आयटीआर सबमिट केला असेल, तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात ई-वेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी तब्बल ३० दिवसांची मुदत मिळते. यामुळे तुमच्या मूळ आयटीआर दाखल करण्याच्या तारखेवर कोणताही परिणाम होत नाही आणि तुम्हाला कोणताही दंड भरावा लागत नाही.
ई-व्हेरीफाय कसा करावा?
प्राप्तीकर विभागाच्या अधिकृत e-Filing पोर्टलवर (incometax.gov.in) जा आणि तुमचा युझर आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
e-File मेनूवर क्लिक करा, तेथून Income Tax Returns निवडा आणि त्यानंतर e-Verify Return या पर्यायावर जा.
ज्या रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन बाकी आहे तो अन-व्हेरीफाइड आयटीआर निवडा आणि e-Verify वर क्लिक करा.
ई-व्हेरिफिकेशनचा तुमचा आवडता पर्याय निवडा आणि स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रक्रिया पूर्ण करा.
वेळेत व्हेरीफाय न केल्यास काय घडेल?
जर तुम्ही ३१ जुलैच्या आतमध्ये आयटीआर फॉर्म भरला असेल आणि पुढील ३० दिवसांत व्हेरीफाय केला तर मूळ दाखल करण्याची तारीख (३१ जुलै) वैध राहते आणि कोणताही दंड लागत नाही. पण, ३१ जुलै रोजी फॉर्म भरला पण ३० दिवसांनंतर व्हेरीफाय केला तर ई-व्हेरिफिकेशनची तारीख हीच रिटर्न दाखल करण्याची तारीख मानली जाते. अशा परिस्थितीत रिटर्न ‘उशिरा भरलेला’ ठरून तुम्हाला दंड लागू शकतो. जर आयटीआर ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत व्हेरीफाय केलाच नाही तर प्राप्तीकर विभाग तो आयटीआर पूर्णपणे अवैध ठरवू शकतो.
