Multiple Income Sources : आजच्या बदलत्या आर्थिक युगात महागाई, जीवनमानाचा खर्च आणि नोकरीची अनिश्चितता यामुळे केवळ एका पगारावर गरजा भागवणे, स्वप्न पूर्ण करणे आणि संपत्ती निर्माण करणे कठीण झाले आहे. सध्याच्या काळात ‘उत्पन्नाचे अनेक मार्ग’ असणे ही काळाची गरज बनली आहे. देशातील करदाते आता एका पगारावर अवलंबून न राहता गुंतवणूक, व्यवसाय, फ्रिलान्सिंग आणि क्रिप्टो करन्सीसारख्या इतर मार्गांनी मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. ‘क्लियरटॅक्स’च्या ‘हाऊ इंडिया फाईल्ड इन २०२६’ या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये स्वतः प्राप्तीकर विवरणपत्र (ITR) भरणाऱ्या तब्बल ४७.३ टक्के करदात्यांनी नोकरीव्यतिरिक्त किमान एका अन्य मार्गाने उत्पन्न मिळाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये हे प्रमाण केवळ ९.५ टक्के होते.

अहवालातील ठळक मुद्दे

  • पगाराव्यतिरिक्त दोन किंवा अधिक मार्गांनी कमाई करणाऱ्या करदात्यांचे प्रमाण अवघ्या चार वर्षांत ३.५ टक्क्यांवरून थेट २४.४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • साध्या आयटीआर-१ पेक्षा इतर जटिल फॉर्म भरणाऱ्यांचे प्रमाण यंदा ६२ टक्क्यांवर गेले आहे. भांडवली नफा आणि व्यावसायिक उत्पन्न दर्शवणारे ITR-२ व ITR-३ फॉर्म भरणाऱ्यांचे प्रमाण यंदा ५७.२ टक्के नोंदवले गेले.
  • भांडवली नफा (शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मालमत्ता खरेदी-विक्रीतून मिळणारा) दाखवणाऱ्या स्वतः प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या करदात्यांचे प्रमाण ४१.७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

तरुणाईचा शेअर बाजार अन् ट्रेडिंगकडे कल

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे या अहवालातून समोर आलं आहे. २५ वर्षांखालील वयोगटातील तब्बल ७५ टक्के करदात्यांनी ITR-2 आणि ITR-3 सारखे क्लिष्ट रिटर्न्स दाखल केले आहेत. गेल्या वर्षी हे प्रमाण ६० टक्के होते. असे असेल तरी भांडवली नफा किंवा तोटा दाखवणाऱ्या २५ वर्षांखालील करदात्यांपैकी ३७ टक्के जणांनी तोटा नोंदवला आहे. वयोमानानुसार हे प्रमाण कमी होत असून, ६० वर्षांवरील करदात्यांमध्ये तोटा दाखवणाऱ्यांचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे.

मध्यमवर्ग आणि महिलांचा वाढता सहभाग

  • अहवालानुसार, ५ लाख ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीय गटातील ४९.६ टक्के करदात्यांनी जटिल रिटर्न्स भरले आहेत. या गटात वर्षभरात १३.४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
  • भांडवली नफा नोंदवणाऱ्या महिला करदात्यांचे प्रमाण ३०.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. याशिवाय ५० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवणाऱ्या महिला करदात्यांच्या संख्येत एका वर्षात ३८ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.

निवृत्तीनंतरही गुंतवणूक सक्रिय

अहवालानुसार, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही ज्येष्ठ मंडळी गुंतवणूक करत असल्याचे यातून समोर आले. ४० ते ५० वयोगटातील ३५ टक्के लोकांच्या तुलनेत, ६० वर्षांवरील ४० टक्के करदात्यांनी कॅपिटल गेन्स नोंदवला आहे. तसेच ५० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी जटिल आयटीआर फॉर्म भरले आहेत.