पीटीआय, नवी दिल्ली : टाटा समूहातील ब्रिटनमधील आलिशान मोटारींची निर्मिती करणाऱ्या जग्वार लँड रोव्हर कंपनीने पुढील दोन वर्षांत जागतिक पातळीवरील मनुष्यबळात चार हजारांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून खर्चात १.७ अब्ज पौंडची बचत करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स कंपनीची जग्वार लँड रोव्हर ही उपकंपनी आहे. कंपनीमध्ये जगभरात सध्या ४३,००० कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील दोन वर्षांत कंपनी चार हजार कर्मचारी कमी करणार आहे. या माध्यमातून कंपनी खर्चात १.७ अब्ज पौंडची बचत करणार आहे. कंपनीकडून भारतात नेमकी किती मनुष्यबळ कपात केली जाणार आहे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलने याविषयी भांडवली बाजाराला माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, जग्वार लँड रोव्हरची कार्यक्षमता वाढविण्यासोबत शाश्वत नफा पातळी कायम ठेवण्यासाठी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या स्पर्धात्मकतेत मोठी वाढ झाली असून, भूराजकीय अनिश्चिततेचा वाहन निर्मिती क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे.
याविषयी जग्वार लँड रोव्हरचे मुख्याधिकारी पी.बी.बालाजी म्हणाले की, पुढील वर्षभरात आम्ही पाच नवीन उत्पादने सादर करणार आहोत. कंपनीचे बाजारपेठेतील स्थान आणि प्रतिष्ठा आणखी भक्कम बनविण्यात येणार आहे. उत्तर अमेरिकेतील बाजरापेठेवर आमचा भर असेल. यापुढील काळात दोन आकडी वाढ नोंदविण्यास यातून आम्हाल मदत होईल.
कंपनीकडून जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या मनुष्यबळात कपात केली जाणार असली तरी ती प्रामुख्याने ब्रिटनमध्ये होईल. जागतिक पातळीवरील कामकाजावर या कपातीचा मर्यादित परिणाम होऊ शकतो. वाहन निर्मिती क्षेत्रासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यात तंत्रज्ञानातील बदल, स्पर्धेतील वाढ आणि भूराजकीय तणाव यांचा समावेश आहे. – पी.बी.बालाजी, मुख्याधिकारी, जग्वार लँड रोव्हर
