Jared Kleinert Remote Work Marathi : भारतात ‘वर्क लाईफ बॅलन्स’वरुन कायम वाद होत असतो. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका कर्मचाऱ्याने भर पावसात वर्क फ्रॉम होम नाकारल्याचं सोशल मीडियावर लिहिलं होतं. मॅनेजरने कर्मचाऱ्याला सांगितलं, की तू बसने ऑफिसला ये, बस बंद असेल तर रिक्षाने ये, रिक्षा बंद असतील तर टॅक्सी करुन ये, पण घरुन काम मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला जर असा बॉस मिळाला की तो म्हणतोय “माझ्या कर्मचाऱ्यांनी कुठूनही काम केलं तरी मला फरक पडत नाही, मला फक्त काम होण्याशी मतबल आहे, मग त्यांनी दिवसभराचे काम १ तासात केले तरी चालेल.”

कोण आहे हा बॉस?

टीम रिट्रीट प्लॅटफॉर्म ‘ऑफसाईट’चे संस्थापक आणि सीईओ जेरेड क्लिनर्ट असं या बॉसचं नाव आहे. एकीकडे कंपन्या ऑफिसमधून काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्ती करत आहे. अशावेळी जेरेड क्लिनर्ट स्पष्ट म्हणाले, की ” माझा कर्मचारी कुठे, कधी आणि कसे काम करतो याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, तर तो कंपनीला काय देतोय (रिझल्ट) देतो हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” क्लिनर्ट यांनी लिंक्डइनवर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, कॉर्पोरेट व्यवस्थापकांच्या भूमिकेवर त्यांनी थेट बोट ठेवले आहे.

Jared Kleinert Remote Work
Jared Kleinert

रिमोट वर्क हाच काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग!

जेरेड क्लिनर्ट यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, “रिमोट वर्क हा काम करण्याचा चांगला पर्याय आहे. त्यांच्या मते, कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पाळत ठेवण्यापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते लिहितात, की कर्मचारी कुठून काम सुरू करतो? किती वाजता कामावर बसतो, ७ की ९. तो दिवसभरात किती ब्रेक घेतो? किंवा घरुन काम करताना आणखी काय करतो? याच्याशी माझा काही संबंध नाही. मला फक्त अंतिम निकाल चांगला हवा.

बॉस म्हणून क्लिनर्ट यांना काय महत्त्वाचं वाटतं?

कामाच्या पद्धतीबाबत क्लिनर्ट यांनी त्यांची धोरणे स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणाले, त्यांचे संपूर्ण लक्ष व्यवसायाचे परिणाम आणि टीमच्या कामगिरीवर असते. यासाठी त्यांनी ४ निकष सांगितले आहे.

  1. संस्थात्मक उद्देश पूर्ण करणे : कंपनीने ठरवून दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण होत आहेत की नाही, हाच यशाचा मुख्य पाया आहे.
  2. ग्राहकांचे समाधान : कंपनीचे ग्राहक सेवा आणि कामगिरीवर आनंदी असणे आवश्यक आहे.
  3. कर्मचाऱ्यांचे लक्ष्य : प्रत्येक कर्मचारी कंपनीच्या मुख्य उद्दिष्टांशी जोडलेला असावा.
  4. गुंतवणुकीवर परतावा : कंपनी कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळावर जो खर्च करत आहे, त्यातून मजबूत आर्थिक परतावा मिळणे गरजेचे आहे.

चांगले नेतृत्व कोणते?

क्लिनर्ट म्हणतात, नेतृत्व म्हणजे कार्यालयात हजेरी लावणे किंवा कर्मचाऱ्यांच्या टाईम-शीट तपासणे नव्हे. तर नेतृत्व म्हणजे असे वातावरण तयार करणे, जिथे कर्मचारी आपले सर्वोत्तम योगदान देऊ शकतील, कंपनीच्या मोहिमेशी बांधील राहतील आणि ग्राहकांना योग्य मूल्य मिळवून देतील.