मुंबईः जागतिक वित्तीय संस्था असलेल्या जेफरीजचा भूतकाळातील ट्रॅक रेकॉर्ड पाहता, त्यांनी भारतीय शेअर बाजारातील ज्या ‘मल्टीबॅगर’ शेअर्सवर विश्वास दाखवला, त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बीएसई (BSE Ltd), झोमॅटो (Zomato / Eternal), ट्रेंट (Trent) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) यांसारख्या शेअर्सचा पोर्टफोलिओत समावेश करण्याचा जेफरीजचा निर्णय गुंतवणूकदारांसाठी अत्यंत नफा देणारा ठरला आहे.

याच धर्तीवर, जेफरीजने आपल्या भारतीय पोर्टफोलिओत पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. बँकांच्या तुफान कर्जवाढीच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट करतानाच, जेफरीजने ‘एचडीएफसी बँक’ आणि ‘पीबी फिनटेक’ (पॉलिसीबाजार) यांना पोर्टफोलिओतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर त्यांच्या जागी ‘एमसीएक्स’ (MCX), ‘लेंसकार्ट’ आणि ‘बजाज फायनान्स’वर नव्याने भरोसा दाखवला आहे.

बँकांच्या पतपुरवठ्यातील (कर्जवाटप) गेल्या एका दशकातील सर्वात वेगवान वाढ, परदेशी भांडवलाचे पुनरागमन आणि रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेले उपाय यांमुळे भारतीय बाजाराचे भविष्य अधिक मजबूत होत आहे, असे ‘जेफरीज’ या जागतिक ब्रोकरेज संस्थेने म्हटले आहे.

जेफरीजचे इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख ख्रिस्तोफर वूड यांनी त्यांच्या ताज्या ‘ग्रीड अँड फिअर’ (भीती आणि लोभ) अहवालात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अनेक सकारात्मक घडामोडी घडत आहेत. या सकारात्मक पार्श्वभूमीवर, जेफरीजने आपल्या ‘इंडिया बाँड व इक्विटी पोर्टफोलिओ’त मोठे बदल केले आहेत.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेली एचडीएफसी बँक आणि पॉलिसीबाजारची मालक कंपनी पीबी फिनटेक यांना पोर्टफोलिओतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या जागी एमसीएक्स आणि लेंसकार्ट सोल्यूशन्सचा समावेश करण्यात आला आहे. बरोबरीने, ‘आरईसी’च्या जागी बजाज फायनान्सला संधी देण्यात आली आहे. शिवाय, ‘भारती एअरटेल’मधील हिस्सा एका टक्क्याने कमी करून तो ‘इटर्नल’मध्ये वाढवण्यात आला आहे.

ख्रिस्तोफर वूड यांच्या मते, देशांतर्गत कर्जवाटपात झालेली वाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वार्षिक पतपुरवठा १७ ते १८ टक्क्यांनी वाढला आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट कर्जांचा वाटा सर्वाधिक म्हणजेच २० टक्के आहे. कृषी आणि रिटेल कर्जवाढही उत्तम राहिल्याने बाजारातील सर्वसमावेशक मागणी स्पष्टपणे दिसून येत आहे. बँकिंग क्षेत्राला अनुकूलता असूनही, या जागतिक संस्थेने पोर्टफोलियोतून एचडीएफसी बँकेला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी २५.८६ अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली आहे. मात्र जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी सुरू झाली असून, त्या महिन्यांत त्यांनी २.१२ अब्ज डॉलरच्या भारतीय शेअर्सची निव्वळ खरेदी केली.