मुंबई: सप्टेंबर २०१६ मध्ये थेट ४जी तंत्रज्ञानासह दूरसंचार क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने देशातील वाटचालीची दशकपूर्ती केली आहे. शून्यापासून सुरू झालेला हा प्रवास जून २०२६ पर्यंत तब्बल ५ कोटी ७९ लाख ग्राहकांपर्यंत पोहोचला असून, आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या एकूण बाजारपेठेत एकट्या जिओचा वाटा ४० टक्के आहे. तब्बल ४५ टक्के वार्षिक चक्रवाढ वेगाने झालेली ही वाढ भारतीय दूरसंचार क्षेत्रासाठी अनोखी गोष्टच आहे.

जूनमध्ये झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी संचालक मंडळाने मसुद्याला (डीआरएचपी) मंजुरी दिल्याची महत्त्वाची घोषणा केली. जागतिक पातळीवरील, अथांग क्षमता आणि मूल्य असलेल्या तंत्रज्ञान कंपन्यांची उभारणी भारत करू शकतो, हे जिओच्या प्रस्तावित सूचिबद्धतेतून जगाला दिसून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मसुदा प्रस्तावातील दूरसंचार नियामक ‘ट्राय’द्वारे प्रसृत आकडेवारीने जिओच्या या जलद विस्ताराचे चित्र समोर आले आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये बाजारात उतरलेल्या जिओने एप्रिल २०१८ मध्ये म्हणजेच दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत एअरटेलला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. तर जुलै २०२० मध्ये व्होडाफोन आयडियाला मागे टाकत जिओने अव्वल स्थान पटकावले आणि तेव्हापासून आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. मोफत व्हॉईस कॉलिंग, अत्यंत रास्त दरातील डेटा (इंटरनेट) आणि मजबूत नेटवर्कच्या बळावर जिओने स्थापनेपासून केवळ चार वर्षांत म्हणजेच जुलै २०२० पर्यंत प्रस्थापित कंपन्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. उल्लेखनीय म्हणजे सेवा अनावरणाच्या पहिल्या महिन्यात १५.५ लाख ग्राहक तिने मिळविले.

जून २०२६ पर्यंत जिओच्या देशभरातील ग्राहकांची संख्या ५३.३३ कोटींवर पोहोचली आहे. यात तब्बल २८.५ कोटी ५जी वापरकर्त्यांचा समावेश आहे. तसेच जिओच्या नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर सरासरी ४३.७ जीबी इतका आहे. अवघ्या एका दशकात एका नवख्या कंपनीपासून बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बनण्याचा जिओचा हा प्रवास भारतातील डिजिटल क्रांतीचे देखील प्रतिनिधित्व करतो.

स्पर्धकांच्या ग्राहकांमध्ये २५ टक्क्यांची घट

जिओच्या आगमनापूर्वी (ऑगस्ट २०१६) मुंबई आणि महाराष्ट्रात एकूण ११.५२ कोटी मोबाईल ग्राहक होते. एकूण १३ सेवा प्रदात्यांमध्ये जिओच्या रूपाने पडलेली ती १४ वी भर होती. तथापि तीव्र स्पर्धेमुळे काही कंपन्यांचे विलीनीकरण झाले, तर काहींना बाजारपेठेतून काढता पाय घ्यावा लागला. परिणामी जून २०२६ पर्यंत ही संख्या १४.४७ कोटींवर पोहोचली. यापैकी एकट्या जिओचे ५.७९ कोटी ग्राहक आहेत, तर उर्वरित सर्व सेवा प्रदात्यांचा एकत्रित ग्राहकवर्ग ८.६७ कोटींवर आहे. म्हणजेच इतर कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत सुमारे २.८४ कोटींची (जवळपास २५ टक्के) मोठी घट झाली असून, त्यातील बहुतांश ग्राहक जिओकडे वळले आहेत.