मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा ‘मेगा आयपीओ’ची चर्चा रंगू लागली आहे. देशातील दोन मोठी नावे – जिओ प्लॅटफॉर्म्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) – यांच्या संभाव्य आयपीओकडे गुंतवणूकदारांचे डोळे लागले आहेत. या दोन्ही आयपीओंना मिळणारा प्रतिसाद भूतकाळातील मारुतीच्या ऐतिहासिक आयपीओची पुनरावृत्ती करेल का, यावर बाजारात चर्चा सुरू झाली आहे.

मारुतीच्या आयपीओने केवळ भांडवल उभारले नव्हते; त्याने देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित केले होते. आता जिओ आणि एनएसईकडूनही अशाच प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. विशेषतः जिओचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींपैकी एक ठरू शकतो, तर एनएसईची बाजारातील मजबूत उपस्थिती गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

तथापि, प्रत्येक मोठा आयपीओ म्हणजे मोठा परतावा असे समीकरण नसते, असा इशारा विश्लेषकांकडून दिला जात आहे. कंपनीचे मूल्यांकन, गुंतवणूकदारांची अपेक्षा आणि बाजारातील स्थिती हे घटक निर्णायक ठरतात. जिओच्या आयपीओमुळे तातडीने मोठा फायदा होईलच असे नाही, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या बाजारात पुरेशी तरलता उपलब्ध असल्याने या दोन मोठ्या आयपीओंमुळे बाजारातील पैशांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

 ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’  आणि ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ या दोन्ही कंपन्यांनी सेबीकडे (SEBI) त्यांचे मसुदा पत्र सादर केले आहे. या पार्श्वभूमीवर, दलाल स्ट्रीटवर एकाच ऐतिहासिक घटनेची चर्चा सुरू झाली आहे “जिओ आणि एनएसईचे हे महा-आयपीओ २००३ मधील ‘मारुती सुझुकी’चा चमत्कार पुन्हा घडवू शकतील का?

२००३ मधील ‘मारुती’चा तो ऐतिहासिक चमत्कार काय होता?

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा ‘केतन पारेख घोटाळा’ आणि ‘डॉट-कॉम बबल’मुळे भारतीय शेअर बाजार पूर्णपणे कोलमडला होता, तेव्हा सामान्य गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास उडाला होता. अशा मंदीच्या वातावरणात २००३-०४ मध्ये ‘मारुती सुझुकी’चा आयपीओ आला. मारुतीच्या या एका आयपीओने बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची अशी काही लाट आणली, की तिथून पुढे २००७ पर्यंत भारतीय शेअर बाजाराने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी तेजी पाहिली.

२०२६ चे चित्र वेगळे: जिओ आणि एनएसईसमोरील आव्हाने

काही विश्लेषकांच्या मते जिओ आणि एनएसईचे आयपीओ देखील बाजाराला नवी गती देऊ शकतात. मात्र, २००३ आणि आजच्या परिस्थितीत मोठा फरक आहे:

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे आव्हान: गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजाराने फारसा मोठा परतावा दिलेला नाही आणि परदेशी गुंतवणूकदारांनी अब्जावधी रुपये काढून घेतले आहेत. अशा वेळी, या दोन महाकाय कंपन्यांना देशांतर्गत नव्हे, तर जागतिक गुंतवणूकदारांना पुन्हा भारताकडे वळवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागेल.

परिपक्व बाजार : २००३ मध्ये डिमॅट खाती आणि गुंतवणूकदार खूप कमी होते. आज भारतात आधीच गल्लीबोळात गुंतवणूकदार तयार झाले आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांची मोठी फौज येण्यापेक्षा, असलेल्या पैशाचे योग्य मूल्यमापन (Valuation) होणे गरजेचे आहे.

अमेरिका विरुद्ध भारत स्पर्धा: सध्या जागतिक पातळीवर ‘OpenAI’ आणि ‘Anthropic’ सारख्या तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकन बाजारात आयपीओ आणत आहेत, जिथे तेजी शिगेला आहे. याउलट, भारतीय बाजारातील संथ गती पाहता जिओ आणि एनएसईला त्यांच्या वाजवी किंमतीच्या जोरावरच गुंतवणूकदार खेचावे लागतील.

तज्ज्ञांच्या मते, हे दोन आयपीओ पूर्ण सबस्क्राईब होतील यात शंका नाही. कारण टेलिकॉम क्षेत्रातील जिओची एकाधिकारशाही आणि शेअर बाजाराच्या व्यापारातील एनएसईचे ‘कॅश जनरेटिंग’ मॉडेल गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. परंतु, मारुतीने जशी ‘रिटेल’ गुंतवणूकदारांची क्रांती घडवली होती, तशीच क्रांती हे दोन आयपीओ घडवणार की नाही, हे या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतरच्या कामगिरीवर आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. जर हे आयपीओ यशस्वी झाले, तर थंडावलेल्या भारतीय प्रायमरी मार्केटला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येऊ शकतात.