नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सेवा कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा (JPL) आयपीओ ऑक्टोबरअखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीचे संभाव्य एंटरप्राइज मूल्यांकन १४३ ते १४६ अब्ज डॉलर, म्हणजेच किमान १२ लाख कोटी रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याची माहिती घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली.

सुमारे ३.८ अब्ज डॉलर (सुमारे ३३ हजार कोटी रुपये) आकाराचा हा आयपीओ भारतीय भांडवली बाजारातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रीपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सने अमेरिका, ब्रिटन, दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांसाठी रोडशो पूर्ण केले आहेत. आता १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सेबीकडे अंतिम कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता असल्याचे बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

परदेशातील रोडशोला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता कंपनीचे मूल्यांकन १४३ ते १४६ अब्ज डॉलर किंवा किमान १२ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर राहू शकते. दसऱ्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांसाठी समभाग विक्री सुरू होऊन, त्यानंतर दसऱ्यानंतर आणि २३ ऑक्टोबरपूर्वी आयपीओ खुला होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्सने जूनमध्ये आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे दाखल केली होती. सेबीने २८ ऑगस्ट रोजी कंपनीला अंतिम निरीक्षणे दिली. कंपनीच्या मसुदा विवरणपत्रानुसार, आयपीओमध्ये २७ कोटी नवीन समभाग जारी करण्याची योजना आहे. हे कंपनीच्या आयपीओनंतरच्या भागभांडवलाच्या सुमारे २.९ टक्के आहे.

दूरसंचारात जिओचे वर्चस्व

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये रिलायन्स समूहाच्या डिजिटल व्यवसायांचा समावेश आहे. त्यातील रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा भारतीय दूरसंचार क्षेत्रात मोठा वाटा आहे. निश्चित दूरसंचार जोडण्यांमध्ये जिओचा बाजारहिस्सा ३२.८९ टक्के, तर मोबाइल जोडण्यांमध्ये ३९.२९ टक्के आहे. कंपनीकडे अनुक्रमे सुमारे १५.७९ कोटी आणि ५०.६ कोटी ग्राहक आहेत. जून २०२६ अखेर जिओकडे चीनबाहेरील सर्वात मोठ्या ५जी स्टँडअलोन नेटवर्कपैकी एक असून, सुमारे २६.८५ कोटी ५जी ग्राहक आहेत. फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस क्षेत्रातही जिओ आघाडीवर आहे. या व्यवसायात कंपनीचे सुमारे १.५ कोटी ग्राहक आहेत. दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणातील डेटा वापराच्या आधारे जिओने क्लाउड, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एंटरप्राइज नेटवर्क सेवांसह डिजिटल क्षेत्रातील इतर व्यवसायांतही विस्तार केला आहे.

नफ्यात १५ टक्के वाढ

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सचा निव्वळ नफा १५ टक्क्यांनी वाढून ३०,०५३ कोटी रुपये झाला. कंपनीचा वार्षिक महसूल १४.५ टक्क्यांनी वाढून १,४६,८८५ कोटी रुपये झाला. नुवामा रिसर्चच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२६ ते २०३० या कालावधीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा सुमारे १८ टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढू शकतो.

मेटा, गुगलसह जागतिक गुंतवणूकदार

२०२० मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. मेटाने ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ९.९९ टक्के हिस्सा, तर गुगलने ३३,७३७ कोटी रुपये गुंतवून ७.७३ टक्के हिस्सा घेतला होता.

सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबादला, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, टीपीजी, एल कॅटरटन, इंटेल कॅपिटल आणि क्वालकॉम व्हेंचर्स या गुंतवणूकदारांनी मिळून सुमारे ७४,७४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मसुदा विवरणपत्रानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जिओ प्लॅटफॉर्म्सचा सुमारे ६६.४ टक्के हिस्सा, तर मेटा आणि गुगलचा मिळून सुमारे १७.७ टक्के हिस्सा आहे. रिलायन्स समूहाचा २००८ नंतरचा हा पहिलाच आयपीओ ठरणार असून, समूहातील ग्राहककेंद्रित व्यवसायाचा हा पहिलाच आयपीओ असेल.