मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सेवा विभागातील उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने शुक्रवारी मंजुरी दिली. याद्वारे ३७,७०० कोटी रुपयांचा (सुमारे ४ अब्ज डॉलर) निधी उभारला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा देशातील आजवरचा सर्वात मोठा ‘आयपीओ’ ठरू शकेल.
जिओ प्लॅटफॉर्म्सने जूनमध्ये भांडवली बाजार नियामकाकडे ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव सादर केला होता. बाजार नियामकाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सला शुक्रवारी, २८ ऑगस्टला सेबीचे अंतिम निरीक्षण प्राप्त झाले. आयपीओ प्रक्रियेत सेबीचे निरीक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर कंपनी लागू असलेल्या नियामक आवश्यकतांच्या अधीन राहून ‘आयपीओ’साठी पुढील तयारी करू शकते. मसुदा प्रस्तावानुसार, जिओ प्लॅटफॉर्म्स २७ कोटी नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या आयपीओद्वारे सुमारे १३७ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनावर, अंदाजे ३७,७०० कोटी रुपये उभारेल, अशी अपेक्षा आहे, तुलनेसाठी सांगायचे तर, राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईचा प्रस्तावित आयपीओ सुमारे ३०,००० कोटी रुपयांच्या घरात असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जर जिओ प्लॅटफॉर्म्सने अंदाजित ३७,७०० कोटी रुपये उभारले, तर हा देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील ती अभूतपूर्व कामगिरी ठरेल.
आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर प्रामुख्याने जिओ प्लॅटफॉर्म्सची महत्त्वाची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड’च्या काही थकीत कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे.
रिलायन्स समूहाची १८ वर्षांनंतर ‘सत्त्वपरीक्षा’!
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित आयपीओकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. कंपनीने यापूर्वी जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान आणि खासगी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारले आहे. वर्ष २०२० मध्ये फेसबुकची मूळ कंपनी मेटाने ४३,५७४ कोटी रुपये गुंतवून ९.९९ टक्के हिस्सेदारी, तर गूगलने ३३,७३७ कोटी रुपये गुंतवून ७.७३ टक्के हिस्सेदारी या कंपनीत मिळविली आहे. या शिवाय, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबादला, एडीआयए, टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ, इंटेल कॅपिटल आणि क्वालकॉम व्हेंचर्स या जागतिक गुंतवणूकदारांकडूनही कंपनीने सुमारे ७४,७४५ कोटी रुपये उभारले आहेत. सध्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा ६६.४३ टक्के हिस्सा आहे. मेटा आणि गूगल यांचा एकत्रित हिस्सा १७.७१ टक्के असून उर्वरित अल्पसंख्य हिस्सा अन्य गुंतवणूकदारांकडे आहे. या आयपीओमुळे २००८ नंतर प्रथमच रिलायन्स समूहातील कंपनी सार्वजनिकरित्या गुंतवणूकदारांना आजमावणार आहे. तसेच समूहातील नव्या पिढीच्या ग्राहक-केंद्रित व्यवसायातील कंपन्यांच्या होऊ घातलेल्या बाजार सूचिबद्धतेच्या मालिकेतील हा पहिलाच आयपीओ असेल.
