digital silver investment JioFinance : डिजिटल सोने-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आता अवघ्या १० रुपयांपासून तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करू शकणार आहात. जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेड या वित्तीय सेवा पुरवठादार कंपनीने आपल्या जिओफायनान्स अॅपवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या नव्या सुविधेमुळे आता १० रुपयांपासून चांदी खरेदी करणे शक्य झाले आहे.
१० रुपयांपासून चांदी खरेदी करता येणार
वापरकर्ते अगदी १० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारात डिजिटल चांदी खरेदी करू शकतात. ही चांदी ९९.९ टक्के शुद्ध आणि प्रत्यक्ष भौतिक चांदीवर आधारित आहे. बाजाराशी जोडलेल्या प्रत्यक्ष वेळेतील दरांवर हे व्यवहार चालतात. विशेष म्हणजे, चांदी विक्रीतून मिळणारी रक्कम थेट वापरकर्त्याच्या बँक खात्यात जमा होते. ज्यांना नियमित गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी साप्ताहिक किंवा मासिक पद्धतीची ‘सिल्व्हर एसआयपी’ सुरू करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल गुंतवणुकीचे रूपांतर भौतिक चांदीच्या नाण्यांमध्ये करता येते किंवा थेट चांदीची नाणी खरेदी करता येतात.
शुद्धतेची हमी
ग्राहकांची खात्री पटण्यासाठी या सुविधेतील सर्व भौतिक चांदीची शुद्धता नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज मान्यताप्राप्त सुविधांमध्ये तपासली जाते.
तज्ज्ञांचे मत काय?
विविध प्रकारच्या गुंतवणुकीची रणनीती तयार करण्यात मौल्यवान धातू आणि कमोडिटीज महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक सक्षम पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीने चांदी भौतिक स्वरूपात सांभाळणे अनेकांसाठी जिकिरीचे ठरते. मात्र, आता साठवणुकीची कोणतीही चिंता न करता सुरक्षितपणे चांदीची मालकी मिळवणे आणि ती विकणे सहज शक्य झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
डिजिटल चांदी खरेदी करताना घ्यायची काळजी?
- नेहमी मान्यताप्राप्त आणि नामांकित प्लॅटफॉर्मवरूनच डिजिटल चांदी खरेदी करा.
- संबंधित प्लॅटफॉर्मचा ट्रॅक रेकॉर्ड आणि बाजारातील प्रतिष्ठा तपासून घ्या.
- तुम्ही खरेदी करत असलेली डिजिटल चांदी ९९.९% शुद्ध आहे याची खात्री करा. प्लॅटफॉर्म आपल्याला हॉलमार्क किंवा शुद्धतेचे प्रमाणपत्र देतो का, हे तपासा.
- डिजिटल चांदी प्रत्यक्षात सुरक्षित सुरक्षित तिजोरीत ठेवली जाते. काही कंपन्या या स्टोरेजसाठी किंवा विम्यासाठी वार्षिक शुल्क आकारतात. हे शुल्क किती आहे, याची आधीच माहिती घ्या.
- चांदी खरेदी करतानाचा दर आणि ती विकतानाचा दर यामध्ये काही तफावत असते. अनेकदा प्लॅटफॉर्म्स खरेदी दरापेक्षा विक्रीचा दर किंचित कमी ठेवतात. हा फरक जितका कमी असेल, तितका तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
