Joint Home Loan Rules : गेल्या काही वर्षात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी कर्जाची मोठी रक्कम मिळवण्यासाठी एकाचे उत्पन्न अपुरे पडत असल्याने संयुक्त गृहकर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पती-पत्नी, भाऊ-बहीण किंवा मित्रासोबत असे संयुक्त होमलोन घेतले जाते. मात्र, जर अचानक एका सह-कर्जदाराचा मृत्यू झाला, तर उर्वरित ईएमआय भरल्याने घराची पूर्ण मालकी दुसऱ्या व्यक्तीला मिळते का? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर अर्थात याचे उत्तर तुम्ही हो’ देण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. यासाठी तुम्हाला संयुक्त गृहकर्जाचे नियम समजून घेणे आवश्यक आङे.
सहकर्जजाराचा मृत्यू झाला तर EMI ची जबाबदारी कोणाची?
संयुक्त गृहकर्ज घेताना दोन्ही कर्जदार हे कर्जासाठी सारखेच जबाबदार असतात. म्हणजेच, एका सह-कर्जदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित सर्व हप्त्यांची कायदेशीर जबाबदारी ही जिवंत असलेल्या सह-कर्जदारावर येते. मृत व्यक्ती हप्त्यात किती वाटा देत होती, याने बँकेला काही फरक पडत नाही. बँकेला आपल्या कर्जाची पूर्ण वसुली करणे महत्त्वाचे असते.
कर्ज फिटले तरी मालकी हक्क आपोआप मिळणार नाही!
तज्ज्ञांच्या मते, जर सहकर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज फेडण्याची जबाबदारी येत असेल तर घराची मालकीही त्यांची होती, असा समज होतो. पण, केवळ EMI भरल्यामुळे मालमत्तेची पूर्ण मालकी जिवंत व्यक्तीकडे येत नाही. घराची मालकी ही ‘टायटल डीड’ वर ठरते, कर्जाच्या परतफेड करण्यावर नाही. मृत व्यक्तीच्या नावावर असलेला घराचा हिस्सा त्याच्या कायदेशीर वारसांकडे (उदा. पत्नी, मुले किंवा मृत्युपत्रानुसार नमूद व्यक्ती) जातो.
उदाहरणार्थ सुरेश आणि रमेश हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांनी संयुक्त कर्ज घेऊन एक घर खरेदी केले. मात्र, अपघाती निधनात सुरेशचा मृत्यू झाला आणि रमेशने उर्वरित कर्ज फेडले. मात्र, मृत भावाच्या हिश्श्याची मालकी त्याच्या पत्नीकडे किंवा मुलांकडे हस्तांतरित होईल. यामुळे, पूर्ण कर्ज भरूनही रमेशला घराची संपूर्ण मालकी मिळणार नाही.
मित्रासोबत होम लोन घेतले असल्यास काय?
मित्रासोबत सह-कर्जदार म्हणून घेतलेल्या लोनच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. मित्राचा मृत्यू झाल्यास, हयात मित्राला कर्ज भरावे लागेल, परंतु मृत मित्राचा हिश्श्याची मालकी त्याच्या वारसांकडे जाईल. त्यामुळेच बँका साधारणपणे कुटुंबात कर्ज देण्याला प्राधान्य देतात.
तोटे व वाद कसे टाळायचे?
भविष्यातील असा वाद टाळायचा असेल तर कर्ज घेतानाच दोघांमध्ये लिखित करार करून ठेवावा, ज्यामध्ये एकाच्या मृत्यूनंतर हिश्श्याचे काय होईल हे स्पष्ट नमूद असावे. प्रत्येकाने आपले मृत्युपत्र स्पष्टपणे बनवून ठेवावे, जेणेकरून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद होणार नाहीत. संयुक्त कर्ज घेताना लोन इन्शुरन्स नक्की घ्यावा. सह-कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी उर्वरित कर्जाची रक्कम भरते, ज्यामुळे हयात व्यक्तीवर आर्थिक ताण येत नाही.
