Shah Rukh Khan Kolkata Knight Riders Business Success: ग्राहक उत्पादनांचे ब्रँड्स आता सेलिब्रिटींना केवळ ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून न पाहता सह-संस्थापक म्हणून पाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत, योग्य भागीदारीची रचना करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. गुंतवणूक बँकर सार्थक आहुजा यांच्याशी झालेल्या संभाषणात चित्रपट निर्माता आणि उद्योजक करण जोहरने सेलिब्रिटी इक्विटी भागीदारी कशी असावी याबद्दल भाष्य केले आहे.

यावेळी करण जोहरने स्वतःची ताकद आणि मर्यादांबाबत स्पष्टपणे भाष्य केले. “माझ्याबद्दल बोलताना अनेकदा ‘बिझनेस ॲक्युमेन’ (व्यावसायिक चातुर्य) हा शब्द वापरला जातो. पण मला सांगायला आवडेल की, मी नेहमीच सर्जनशीलतेने प्रेरित असलेला कलाकार आहे”, असे तो म्हणाला.

काही क्लिष्ट व्यवहारांच्या वेळी तांत्रिक व्याख्यांमुळे गोंधळून गेल्याच्या क्षणांची आठवण सांगत त्याने पुढे म्हटले की, “माझी उपजत समज हीच माझी सर्वात मोठी शक्ती आहे.” त्याने असे सुचवले की, सेलिब्रिटी सह-संस्थापक भागीदारीच्या रचनेचे मूल्यमापन करताना हीच उपजत समज केंद्रस्थानी असते.

शाहरुख खान आणि कोलकाता नाईट रायडर्स

सेलिब्रिटी मालकी कशी यशस्वी होते, हे स्पष्ट करण्यासाठी करण जोहरने शाहरुख खान आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या भागीदारीचे उदाहरण दिले.

“शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स ही टीम २००८ मध्ये विकत घेतली होती, आज त्याचे मूल्य पहा. हे कशामुळे झाले? कारण शाहरुख खान केकेआरबाबत अत्यंत झपाटलेला, उत्साही आणि प्रामाणिक आहे. तो फक्त स्टेडियममध्ये उपस्थिती लावत नाही किंवा या भागीदारीला फक्त स्वतःचे नाव देत नाही. तो रणनीती आखतो आणि टीमसाठी वेळ देतो. म्हणूनच हा त्याच्यासाठी इतका फायदेशीर प्रकल्प ठरला आहे.”

अर्थपूर्ण मालकी हक्क हे अर्थपूर्ण सहभागाशी संबंधित असावेत. जो सेलिब्रिटी केवळ आपल्या ओळखीशिवाय इतर काही देत नाही त्याला सह-संस्थापकाप्रमाणे मालकी हक्क मिळू नयेत.

दिखाव्यापेक्षा अस्सलपणा महत्त्वाचा

करण जोहरने यावर भर दिला की, वरवरच्या किंवा केवळ नावापुरत्या असलेल्या भागीदारी ग्राहकांच्या लगेच लक्षात येतात.

तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही जे विकत आहात त्याबद्दल तुम्हाला खरोखरच ओढ असते, तेव्हा तुम्ही फक्त असं म्हणत नाही की, ‘अरे, मी एक मूव्ही स्टार आहे, म्हणून मी एखादा ब्युटी ब्रँड सुरू केला पाहिजे.’ जेव्हा तुम्ही त्यासाठी तुमचे सर्वस्व, वेळ आणि ऊर्जा देत नाही, तेव्हा ग्राहक ते पटकन ओळखतात.”