Kavya Maran Net Worth And Biography Sunrisers Hyderabad Owner: सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांच्याकडे इंग्लंडमधील क्रिकेट लीग द हंड्रेडच्या सनरायझर्स ईस्टर्न केप आणि सनरायझर्स लीड्स या संघांचीही मालकी आहे. १२ मार्च रोजी पार पडलेल्या इंग्लंडमधील ‘द हंड्रेड मेन्स २०२६’ लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार एहमदला खरेदी केल्यामुळे काव्या मारन यांना देशभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे.

याबरोबरच सोशल मीडियावर काव्या मारन सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तसेच त्यांचे शिक्षण, करिअर आणि संपत्तीची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

काव्या मारन कोण आहेत?

काव्या मारन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९९१ रोजी झाला असून सध्या त्यांचे वय ३५ वर्षे आहे. त्या सध्या सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या कार्यकारी संचालक आहेत. तसेच त्या सन ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत.

काव्या मारन यांचे शिक्षण

काव्या यांनी चेन्नई येथील स्टेला मारिस कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि बी.कॉम ही पदवी संपादन केली. त्यानंतर काव्या यांनी न्यूयॉर्क येथील NYU स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचे शिक्षण घेतले.

काव्या मारन यांची व्यावसायिक कारकिर्द

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर काव्या अमेरिकेहून चेन्नईला परतल्या आणि सन ग्रुपमध्ये कार्यरत झाल्या. सध्या त्या समूहाच्या क्रीडा क्षेत्रातील व्यवसायांच्या प्रमुख आहेत. ज्यामध्ये आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद आणि द हंड्रेडमधील सनरायझर्स ईस्टर्न केप व सनरायझर्स लीड्स या क्रिकेट फ्रॅन्चायझींचा समावेश आहे.

काव्या मारन यांची संपत्ती

जानेवारी २०२४ मध्ये त्यांना ‘फेस अँड फोर्स बिहाइंड सनरायझर्स हैदराबाद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये काव्या यांचा ‘१०० वुमन अचिव्हर्स ऑफ इंडिया’ यादीत समावेश झाला होता. या यादीत स्थान मिळवणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला उद्योजिका ठरल्या होत्या.

काव्या मारन सन ग्रुपचे मालक कलानिधी आणि कावेरी मारन यांच्या कन्या आहेत. काव्या यांची एकूण वैयक्तिक संपत्ती ४०० कोटी रुपयांहून अधिक आहे, तर त्यांच्या वडिलांची संपत्ती सुमारे २५,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

काव्या यांच्या चेन्नईमधील घराची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे रोल्स-रॉयस, बेंटली, फेरारी आणि बीएमडब्ल्यू यांसारख्या अनेक आलिशान गाड्याही आहेत.