Defective Machinery Consumer Court Compensation rights for small scale businesses explained: केरळमधील एका महिला खाद्य उद्योजकाची ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीनमधील २५ लाख रुपयांची गुंतवणूक पहिल्या दिवसापासूनच मशीन नीट न चालल्यामुळे तोट्यात गेली आहे. केरळ ग्राहक आयोगाने आता उत्पादकाला मशीन बदलून देण्याचे आणि ७५००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या मते, उत्पादनातील दोषामुळे नव्हे, तर सदोष इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरच्या सेवेमुळे हा बिघाड झाला होता.

पलक्काड जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष विनय मेनन व्ही आणि सदस्य विद्या ए व कृष्णनकुट्टी एन के यांच्यासमोर पलक्काडच्या कांजीकोड येथील एसकेएस फूड्स या प्रोप्रायटरी कंपनीने, जून २०२३ मध्ये खरेदी केलेल्या ऑटोमॅटिक बॉटल-फिलिंग आणि कॅप-सीलिंग मशीनमधील बिघाडासंदर्भात एर्नाकुलमस्थित अभिलाष इंडस्ट्रीज विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी पार पडली.

“जेव्हा एखादी तक्रारदार आर्थिक मदत घेऊन आपल्या व्यवसायातील सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने यंत्रसामग्री खरेदी करते, तेव्हा ती खरेदी आपल्या आयुष्यात सुधारणा होईल या मोठ्या अपेक्षेने केलेली असते. मात्र, या प्रकरणात तक्रारदाराला हाल सोसावे लागले”, असे निरीक्षण आयोगाने १७ जुलै रोजी नोंदवले. उत्पादक कंपनी विक्रीनंतर पुरेशी सेवा देण्यात अपयशी ठरली असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञाला त्या मशिनमध्ये कोणताही दोष आढळला नाही, त्यामुळे आयोगाने मशीनची खरेदी रक्कम परत करण्याचे आदेश दिले नाहीत. त्याऐवजी, अयोग्य इन्स्टॉलेशन, सदोष प्रोग्रामिंग, अयोग्य कॅलिब्रेशन आणि विक्रीनंतर अपुरी सेवा यांमुळे ती मशीन यंत्र तीन वर्षांहून अधिक काळ वापरायोग्य राहिले नाही, असा निष्कर्ष आयोगाने काढला.

आयोगाने मशीनच्या उत्पादकाला ४५ दिवसांच्या आत ती मशीन बदलून तशीच दुसरी मशीन देण्याचे, तसेच सेवेतील त्रुटीबद्दल ५०००० रुपये नुकसानभरपाई आणि कायदेशीर खटल्याचा खर्च म्हणून २५००० रुपये देण्याचे निर्देश दिले.

याव्यतिरिक्त, आयोगाने असेही आदेश दिले की, जर ४५ दिवसांच्या आत या निर्देशांचे पालन केले नाही, तर आदेशाच्या तारखेपासून ते अंमलबजावणी होईपर्यंतच्या कालावधीसाठी तक्रारदार दरमहा १००० रुपये इतकी अतिरिक्त भरपाई मिळण्यास पात्र असेल.

ग्राहकांसाठी महत्त्वाचा मुद्दा

उदरनिर्वाहासाठी किंवा लहान व्यवसायासाठी यंत्रसामग्री खरेदी केल्याने तुमचे ग्राहक हक्क आपोआप हिरावले जात नाहीत. उत्पादनात दोष नसला तरी, सदोष इन्स्टॉलेशन, कॅलिब्रेशन किंवा विक्रीनंतरच्या अपुऱ्या सेवेमुळे उत्पादन निकामी झाल्यास, तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत बदली, नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च मागू शकता.

ग्राहक-संबंधित तक्रारींसाठी, आपापल्या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील ग्राहक हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात किंवा मदतीसाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनला १९१५ वर कॉल करू शकतात.