KFC and Pizza Hut India Merger News: देवयानी इंटरनॅशनल आणि सॅफायर फूड्सच्या शेअर्समध्ये आज (२ जानेवारी) मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये आज ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बीएसईवर या शेअरची किंमत प्रति शेअर १५९.४५ रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान, सॅफायर फूड्सचे शेअर्स जवळजवळ ६ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर २४६.८० रुपयांवर आले आहेत. या दोन्ही कंपन्या भारतात अमेरिकेतील यम ब्रँडच्या पिझ्झा हट आणि केएफसी फ्रँचायझी चालवतात. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होणार असल्याची बातमी समोर आल्यामुळे आज त्यांच्या शेअर्सच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत.

देवयानी इंटरनॅशनल आणि सॅफायर फूड्स हे दोन्ही यम ब्रँडच्या फ्रँचायझी आहेत आणि भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसारख्या प्रमुख फूड चेन चालवतात. या विलीनीकरणामुळे भारतात केएफसी आणि पिझ्झा हटसाठी एकच फ्रँचायझी निर्माण होणार आहे.

गुरुवारी (१ जानेवारी) देवयानी इंटरनॅशनल आणि सॅफायर फूड्स इंडियाच्या संचालक मंडळांनी या विलीनीकरण योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेनुसार सॅफायर फूड्सचे देवयानी इंटरनॅशनलमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे.

या विलीनीकरणाच्या अटींनुसार, सॅफायर फूड्सच्या शेअरधारकांना प्रत्येक १०० शेअर्सच्या बदल्यात देवयानी इंटरनॅशनलचे १७७ शेअर्स मिळतील. हे विलीनीकरण शेअर स्वॅपद्वारे केले जाईल आणि दोन्ही कंपन्या सहकारी कंपनी म्हणून काम करतील.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना देवयानी इंटरनॅशनलसाठी हे विलीनीकरण अधिक फायदेशीर वाटले, त्यामुळे देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे सॅफायर फूड्सचे शेअर्स थोडेसे घसरले.

ब्रोकरेज फर्म्स यूबीएस आणि जेपी मॉर्गन सारख्या प्रमुख तज्ञांचा असा विश्वास आहे की या विलीनीकरणामुळे देवयानी इंटरनॅशनलला मोठा फायदा होईल. त्यांच्या मते कंपनीला विलीनीकरणानंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी २१०-२२५ कोटी रुपयांची बचत होईल.

दरम्यान, या दोन्ही कंपन्यांची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. त्यासाठी सेबी, एनसीएलटी आणि दोन्ही कंपन्यांच्या शेअरधारकांची मंजुरी आवश्यक आहे. संपूर्ण प्रक्रियेला अंदाजे १२ ते १५ महिने लागण्याची अपेक्षा आहे. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, देवयानी इंटरनॅशनल भारतातील सर्वात मोठ्या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) कंपन्यांपैकी एक बनेल.