मुंबई : मासिक डेरिव्हेटिव्हज एक्स्पायरीच्या दिवशी सेन्सेक्समध्ये अवघ्या काही मिनिटांत झालेल्या प्रचंड चढ-उतारांवरून आता बाजार नियामक सेबीसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी भाजप खासदार आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉ. किरीट सोमय्या यांनी सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांना पत्र लिहून २७ ऑगस्ट रोजी सेन्सेक्समध्ये झालेल्या असामान्य हालचालींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘क्लोजिंग ऑक्शन सेशन’ (सीएएस) यंत्रणेत मूलभूत त्रुटी आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

२७ ऑगस्ट रोजी बाजार बंद होण्यापूर्वीच्या अवघ्या १० मिनिटांच्या कालावधीत दुपारी ३.२० ते ३.३० या वेळेत सेन्सेक्स २२०० अंशांहून अधिक घसरला आणि त्यानंतर जवळपास २००० अंशांची सुधारणा झाली. या अनपेक्षित हालचालीमुळे बाजारातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांमध्ये चर्चेला उधाण आले. विशेष म्हणजे, सीएएस लागू झाल्यानंतरची ही पहिलीच मासिक डेरिव्हेटिव्हज एक्स्पायरी होती.

‘ही केवळ बाजारातील अस्थिरता नाही’

सोमय्या यांनी या हालचालीला ‘असामान्य’ संबोधत सेबीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सीएएसच्या रचनेतील काही कमतरता या हालचालीमागे कारणीभूत होत्या का, हे तपासणे आवश्यक आहे. या हालचालीमागे केवळ बाजारातील नैसर्गिक अस्थिरता होती की एखाद्या यंत्रणेतील त्रुटीचा फायदा घेतला गेला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ही हालचाल जाणूनबुजून घडवून आणली गेली होती का किंवा सीएएस यंत्रणा अपयशी ठरवण्याच्या उद्देशाने ‘सॅबोटाज’चा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

‘सेबीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धोरणाची फेरतपासणी करावी, आवश्यक असल्यास ते पुन्हा तयार करावे आणि बाजारात फेरफार करणाऱ्यांवर कारवाई करावी,’ अशी भूमिका सोमय्या यांनी मांडली आहे.

‘क्लोजिंग ऑक्शन’मध्ये नेमके काय होते?

सीएएस ही बाजारातील समभागांच्या अधिकृत बंद भावाची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी आणलेली नवी यंत्रणा आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार दुपारी ३.१५ वाजता सातत्यपूर्ण व्यवहार थांबतात आणि त्यानंतर स्वतंत्र लिलाव प्रक्रिया सुरू होते. दुसरीकडे, समभाग निर्देशांकांशी संबंधित डेरिव्हेटिव्हजचे व्यवहार ३.४० वाजेपर्यंत सुरू राहतात. यामुळे बाजारातील सर्वाधिक तरलतेचा कालावधी संपल्यानंतर समभागांच्या बंद भावाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रोख बाजार आणि डेरिव्हेटिव्हज बाजारातील भावांमधील समतोल साधण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होऊ शकते, असा आक्षेप तज्ज्ञांकडून घेतला जात आहे.

एनएसई आणि बीएसईवरील तरलतेचा फरक

सीएएसमधील आणखी एक मुद्दा म्हणजे एनएसई आणि बीएसईवर स्वतंत्र बंद लिलाव होणे. दोन्ही बाजारांवर स्वतंत्र ऑर्डर बुक असल्याने मागणी-पुरवठ्यातील असमतोलामुळे दोन्ही ठिकाणी वेगवेगळे समतोल भाव तयार होऊ शकतात. सीएएसच्या पहिल्याच दिवशी नोंदवलेल्या लिलावातील उलाढालीत मोठा फरक दिसून आला. एनएसईवर सुमारे १,२७६ कोटी रुपयांची उलाढाल, तर बीएसईवर केवळ १०.८ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. त्यामुळे बंद भाव निश्चित करताना बाजारातील तरलतेची गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सोमय्या यांच्या पत्रासोबतच्या तांत्रिक नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

छोट्या व्यवहारांचा मोठ्या मूल्यांकनावर परिणाम?

बंद भाव हा केवळ दिवसातील शेवटचा समभागभाव नसतो. त्याचा परिणाम म्युच्युअल फंडांच्या एनएव्हीवर, निर्देशांकांच्या पातळीवर, निष्क्रिय निधींच्या ट्रॅकिंगवर, ‘मार्क-टू-मार्केट’ मूल्यांकनावर आणि डेरिव्हेटिव्हजच्या अंतिम तडजोडीवर होतो. त्यामुळे कमी व्यवहार असलेल्या लिलावात तुलनेने लहान ऑर्डर्समुळे मोठ्या बाजारमूल्यांवर परिणाम होऊ शकतो का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अधिकृत बंद भाव हा प्रत्यक्ष बाजारमूल्याचे योग्य प्रतिबिंब ठरण्यासाठी लिलावात पुरेशी दोन्ही बाजूंची तरलता असणे आवश्यक असल्याचे तांत्रिक नोंदीत म्हटले आहे.

सेबीची भूमिका काय?

२७ ऑगस्टच्या हालचालींनंतर सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी क्लोजिंग ऑक्शन सेशनमध्ये तातडीने कोणतेही बदल करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमय्या यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीमुळे सीएएसच्या रचनेवरील चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  विशेष म्हणजे, सीएएसच्या अंमलबजावणीनंतर बाजार नियामकाचे लक्ष या यंत्रणेतील संभाव्य गैरवापरावर आधीपासून आहे. यापूर्वी १३ ऑगस्टच्या सेन्सेक्स एक्स्पायरीदरम्यान सीएएसमध्ये कथित फेरफार केल्याप्रकरणी सेबीने दोन संस्थांवर कारवाई करून सुमारे ३.६८ कोटी रुपयांच्या कथित अवैध नफ्यावर टाच आणली होती.

पुढे काय?

२७ ऑगस्टच्या असामान्य हालचालीमुळे आता सीएएसच्या रचनेबरोबरच त्यातील तरलता, ऑर्डर मॅचिंग आणि डेरिव्हेटिव्हज बाजाराशी असलेला संबंध यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. सोमय्या यांनी धोरण तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, स्वतंत्र चौकशी आणि आवश्यक असल्यास सीएएसच्या नियमांची फेररचना करण्याची मागणी केली आहे. सेबी या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि २७ ऑगस्टच्या चढ-उतारामागे नेमके कोणते घटक कारणीभूत होते, याकडे आता बाजारातील सहभागींचे लक्ष लागले आहे.