LPG PNG New Rules September 2026 : आज (१ सप्टेंबर २०२६) पासून तुमच्या खिशावर थेट परिणार करणाऱ्या काही गोष्टींचे नियम बदलणार आहेत. देशात एलपीजी आणि पीएनजी गॅस सिलिंडरसंदर्भात ७ मोठे नियम लागू होत आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या ग्राहकांवर या नव्या नियमांचा थेट प्रभाव पडणार आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या किचनचे बजेट बदलावे लागू शकते.
१. दरमहा किमतींचा आढावा
दर महिन्याच्या १ तारखेप्रमाणेच १ सप्टेंबर रोजी सरकारी तेल कंपन्या १४.२ किलोग्रॅमचे घरगुती आणि १९ किलोग्रॅमचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींनुसार सिलिंडरचे दर कमी किंवा जास्त होऊ शकतात. जागतिक बाजारातील इंधनदरवाढीचा परिणाम गॅस सिलेंडरच्या किमतींवर पाहायला मिळू शकतो.
२. आधार बायोमेट्रिक e-KYC मुदत संपली
एलपीजी कनेक्शनसाठी बायोमेट्रिक e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत आज (३१ ऑगस्ट) संपत आहे. जर तुम्ही अजूनही ई केवायसी पूर्ण केली नसेल तर त्वरा करा. अन्यथा १ सप्टेंबरपासून नवीन सिलिंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात. अशा ग्राहकांचे गॅस कनेक्शन तात्पुरते खंडित केले जाऊ शकते.
३. LPG ऐवजी PNG अनिवार्य होणार
देशातील एलपीजी संकटानंतर केंद्र सरकार आता पाईप गॅस (PNG) वापराला प्रोत्साहन देत आहे. नव्या प्रोत्साहन योजनेनुसार, तुमच्या सोसायटीत किंवा भागात पीएनजीची पाईपलाईन उपलब्ध असल्यास एलपीजीवरून पीएनजीवर शिफ्ट होणे अनिवार्य असेल. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते.
४. नवीन एलपीजी कनेक्शनवर तात्पुरती बंदी
मध्यपूर्वेतील संघर्ष आणि जागतिक पुरवठा साखळी अजूनही विस्कळीत असल्याने १४.२ किलोच्या नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनवर लावलेली तात्पुरती बंदी कायम राहील. या बंदीबाबत तेल कंपन्या सप्टेंबर महिन्यात आढावा घेऊन नवीन अपडेट जारी करण्याची शक्यता आहे.
५. सिलिंडर बुकिंगमधील २५ आणि ४५ दिवसांचा नियम
होर्मुझ सागरीमार्गाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन सिलिंडर रिफिल बुकिंगमधील अंतराचा नियम कायम ठेवण्यात आला आहे. शहरी भागातील ग्राहकांना दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे तर ग्रामीण भागातील ग्राहकांना किमान ४५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल.
६. कनेक्शन सरेंडर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत
तुम्ही एलपीजीवरुन पीएनजीवर शिफ्ट झाल्यानंतर जुने कनेक्शन सरेंडर करण्यासाठी ग्राहकांना ३० दिवसांचा कालावधी दिला जाईल. भविष्यात तुम्ही पीएनजी सुविधा नसलेल्या भागात राहण्यास गेल्यास ‘ट्रान्सफर व्हॉउचर’ दाखवून पुन्हा नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकता.
७. डिलिव्हरीसाठी ओटीपी अनिवार्य
बाजारातील काळाबाजार रोखण्यासाठी गॅस वितरण प्रणालीत ऑनलाईन बुकिंग आणि डिलिव्हरी ओटीपी सक्तीचा करण्यात आला आहे. डिलिव्हरी बॉय घरी आल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ‘ओटीपी’ दिल्यानंतरच सिलिंडर दिला जाईल.
