आशिष थत्ते
Made In India A Titan Story : वेबसिरीज जेव्हा बघितली आणि लिहायचे ठरवले तेव्हा पहिले टेन्शन आले की, नायकाचे नाव मराठीत कसे लिहायचे? झर्कसिस देसाई, असे जेव्हा त्यांच्या सहकाऱ्याला म्हणायची वेळ येते तेव्हा तो सुद्धा मिस्टर देसाई असेच म्हणणे निवडतो. त्यांचे नाव जरी पुकारायला कठीण असले तरी कार्य मात्र टाटा समूहासाठी वाखाणण्याजोगे होते. भारतरत्न जेआरडी टाटा यांनी त्यांच्यावर नेहमीच विश्वास ठेवला. जेव्हा झर्कसिस त्यांच्याकडे घड्याळे बनवण्याचा प्रस्ताव घेऊन येतात तेव्हा जेआरडी हा विचार पूर्णतः नाकारतात पण तरीही स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्या वेळच्या सगळ्यात मोठ्या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला एकत्र काम करण्याचा प्रस्ताव देतात. स्विस कंपनीचा मालक हा प्रस्ताव नाकारतो, तो कारण देतो की, भारतीय लोक जागतिक दर्जाची घड्याळे बनवू शकणार नाहीत. जेआरडी भारतात परतल्यावर आपल्या हातातील घड्याळ काढून ठेवतात आणि सांगतात की, जोपर्यंत आपण आता घड्याळ बनवत नाही तोपर्यंत मी घड्याळ घालणार नाही आणि झर्कसिस देखील आपल्या हातातील घड्याळ उतरवतो. इथून सुरू होतो तो टायटनच्या उभारणीचा प्रवास जो अर्थातच या सहा भागांच्या वेबसिरीजमध्ये रंजकपणे दाखवला आहे.
पहिले आव्हान उभे राहते ते म्हणजे संचालक मंडळाची मंजुरी जी अर्थातच मिळते, नंतर बँकेतून कर्ज काढण्याचे अवघड काम ते सुद्धा पूर्ण होते आणि मग तामिळनाडूमध्ये कारखाना उभारण्याचा प्रवास तो देखील रंजकपणे दाखवला आहे. कुठलेही कौशल्य नसताना तामिळनाडूमधील अकुशल कामगारांना घड्याळ बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे प्रसंग सुद्धा चांगलेच रंगले आहेत.
मला ही वेबसिरीज आवडली कारण उद्योगातील अतिशय महत्वाची गोष्ट यात अधोरेखित केली आहे, ती म्हणजे नाममुद्रा उभारणी किंवा ब्रँड बिल्डिंग. शून्यापासून सुरुवात करून एक मोठी नाममुद्रा कशी बनवायची याचा वस्तुपाठच यात दिला आहे. उद्योग फक्त उभारून चालत नाही त्याचा एक ब्रँड बनवावा आणि टिकवावा लागतो. टायटनच्या यशात फक्त झर्कसिस किंवा जेआरडी यांचा वाटा नसून इतर कित्येक लोकांनी आपले योगदान दिले आहे. ही वेबसिरीज विनय कामथ यांच्या पुस्तकावर आधारित आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी पुस्तक सुद्धा वाचावे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या टाटायनमध्ये सुद्धा टायटनचे संदर्भ आढळतात. वेबसिरीजमध्ये जाहिरात बनवताना सहानुभूतीपूर्ण जाहिराती बनवून मानवी भावनांना साद घालत नाममुद्रा बनवली जाते याचे अचूक चित्रण केले आहे. टायटनचे प्रसिद्ध संगीत कसे शोधले गेले आणि नंतर ते कसे वापरले गेले हे देखील वेबसिरीजमध्ये सांगितले आहे.
प्रत्यक्षात बाजारात जाऊन सर्वेक्षण करताना किती बारकाईने आणि जोखीम घेऊन करावे लागते, तसेच प्रत्येक वेळेला बाजारातील अंदाज घेऊन आपली पावले टाकावी लागतात. जेव्हा बाजारातील वितरकांनी टायटनचे घड्याळ विकायला नकार दिला, तेव्हा त्यांनी स्वतःचेच शोरूम सुरू करून स्वतःच वितरक होण्याचे ठरवले आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले. बंगळुरूतील सफिना प्लाझा येथील पहिले दालन आज सुद्धा तिथे सुरू आहे.
वेबसिरीजमध्ये अजून एका गोष्टीचा संदर्भ आढळतो जो वित्त किंवा उद्योगाशी संबंधित नसला तरी अतिशय खुबीने दाखवला आहे. जेव्हा आपण आपल्या कारकिर्दीकडे लक्ष देत असतो तेव्हा आपली मुले, आपले पालक यांना द्यायला आपल्याला वेळच नसतो आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आपण दुर्लक्षित करत असतो.
उद्योगातील आणि विशेषतः किरकोळ वस्तूंच्या उद्योगात वस्तूच्या डिझाईनचे देखील अनन्यसाधारण महत्त्व असते. वेबसिरीजमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून घड्याळाच्या डिझाईनवर कसे काम करतात आणि जेव्हा कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असते तेव्हा नवीन डिझाईन कसे कंपनीला तारून नेते याचे रंजक चित्रण केले आहे. किरकोळ वस्तूंच्या बाजारात ग्राहकाला काहीतरी नेहमी नवीन देणे फार आव्हानात्मक असते, घडाळ्यांच्या दुनियेत काय नवीन देऊ शकतो याचा जेव्हा विचार झाला, तेव्हा सुरुवातीला मेकॅनिकल घड्याळ न देता क्वार्ट्झ घड्याळ देण्याचे ठरवले आणि मग नंतर काहीतरी नवीन देताना नेहमी नवीन डिझाईन देण्याचे कंपनी ठरवते.
हा लेखप्रपंच फक्त उद्योगासाठी नसून वित्त विषयातील एका महत्त्वाच्या संकल्पनेसाठी सुद्धा आहे आणि ती म्हणजे युनिफॉर्म कन्झ्युमर प्राईझ. किरकोळ विक्रेत्यांना आपल्या उत्पादनांची किंमत सगळ्या देशात सारखी ठेवायची असते. टायटनच्या बाबतीत जेव्हा त्यांना समजते की, दक्षिण भारतातील किमती उत्तेरतील किमतीपेक्षा कमी आहेत, ज्यामुळे तस्कर दक्षिणेतून खरेदी करून उत्तरेत अनाधिकृत विक्री करत आहेत तेव्हा ते देशभरात एकाच किमतीचे धोरण ठरवतात. जे त्या वेळेच्या इतर सर्व कंपन्यांच्या धोरणांना छेद देणारे असते. या धोरणामुळेच देशात अधिकतम किरकोळ विक्री किमतीची संकल्पना आली. तुम्ही किरकोळ वस्तूंच्या मोठ्या दुकानात गेलात तर हमखास ७ टक्के सवलत दिसते. याचे कारण ८० च्या दशकात टायटनने यशस्वीरित्या स्वीकारलेली युनिफॉर्म कन्झ्युमर प्राईझ.
वेबसिरीज अर्थातच खूप काही शिकवून देणारी आणि तितकीच रंजक देखील आहे, तसेच इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. पुढे जाऊन तनिष्क किंवा जेआरडी टाटा यांच्या जीवनावर वेबसिरीज आल्यास त्याही तितक्याच रंजक असतील असे वाटते. नासिरुद्दीन शाह, जिम सरभ आणि मराठमोळा वैभव तत्ववादी अभिनेता असलेली ही वेबसिरीज तुम्ही नक्की बघा पण वित्तीय नजरेतून!
