पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून २०२६ या पहिल्या तिमाहीत देशातील प्रवासी वाहने आणि वाणिज्य वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे, असे वाहन निर्मिती क्षेत्रातील उद्योग संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
‘सियाम’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत देशात १२.७४ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात सर्वाधिक ३.९ लाख वाहनांची विक्री नोंदवली.
प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्राने १,४७,४४० वाहनांच्या विक्रीसह देशात पहिले स्थान मिळवले. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात १,३५,३२९, गुजरातमध्ये ९८,७८५, कर्नाटकमध्ये ९८,३१५ आणि तमिळनाडूमध्ये ९६,३२७ प्रवासी वाहनांची विक्री झाली. वाणिज्य वाहनांच्या श्रेणीत देशात २.६५ लाख वाहनांची विक्री झाली आणि यातही ९१,०००च्या विक्रीसह पश्चिम विभाग आघाडीवर राहिला. सरलेल्या तिमाहीत महाराष्ट्रात ३६,४३३ वाणिज्य वाहनांची विक्री झाली आणि या यादीत तो देशात अव्वल स्थानी होता. त्यानंतर तामिळनाडू (२४,७४३ वाहने), कर्नाटक (२१,८३० वाहने), गुजरात (२१,७७८ वाहने) आणि उत्तर प्रदेश (२१,१६१ वाहने) असा क्रम राहिला.
महाराष्ट्रातील शहरीकरणाची पातळी, मोठी अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक वाहतुकीची गरज यामुळे प्रवासी तसेच वाणिज्य वाहनांच्या विक्रीत राज्याची आघाडी कायम आहे. दुसरीकडे, मोठी लोकसंख्या आणि ग्रामीण बाजारपेठेमुळे उत्तर प्रदेश दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी देशातील महत्त्वाची बाजारपेठ ठरत आहे, असे ‘सियाम’ने म्हटले आहे.
पहिल्या तिमाहीत भारतात ५६.२९ लाख दुचाकींची विक्री झाली. यातही १६.६१ लाखांच्या विक्रीसह पश्चिम विभागाचीच आघाडी राहिली. मात्र उत्तर प्रदेशमध्ये देशात सर्वाधिक ८,८२,०४७ दुचाकींची विक्री झाली. त्यानंतर महाराष्ट्र (५,६१,७३८), तामिळनाडू (४,८०,६५३), कर्नाटक (३,७४,२२१) आणि बिहार (३,६९,३०२) अशी राज्यवार दुचाकी विक्री कामगिरी राहिली. तर एप्रिल-जून तिमाहीत देशात २.१४ लाख तीन-चाकी वाहनांची विक्री झाली आणि यात ७१,००० वाहनांच्या विक्रीसह दक्षिण विभाग आघाडीवर राहिला. तथापि सर्वाधिक २५,६६९ तीन-चाकी वाहनांची विक्री उत्तर प्रदेशमध्ये झाली. त्यानंतर गुजरात (२०,५३४), कर्नाटक (१९,१९२), बिहार (१५,६५३) आणि आसाम (१५,२२३) या राज्यांचा क्रम राहिला.
वाहन विक्रीतील आघाडीची राज्ये
वाहन प्रकार पहिले राज्य विक्री
प्रवासी वाहने – महाराष्ट्र – १,४७,४४०
वाणिज्य वाहने – महाराष्ट्र – ३६,४३३
दुचाकी – उत्तर प्रदेश – ८,८२,०४७
तीनचाकी – उत्तर प्रदेश – २५,६६९
