पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील निर्मिती क्षेत्र मार्च महिन्यात घरघर लागल्याचे सरकारी मासिक सर्वेक्षणातून गुरुवारी समोर आले. युद्धामुळे बाजारपेठेत अस्थिरता वाढली असून, त्याचाच परिणाम होऊन नवीन कार्यादेश आणि उत्पादनात घट झाल्याचेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एचएसबीसी इंडियाद्वारे निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित (पीएमआय) निर्देशांक मार्च महिन्यात ५३.९ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या महिन्यात (फेब्रुवारी २०२६) निर्देशांक ५६.९ गुणांवर नोंदविला गेला होता. गेल्या महिन्यात निर्देशांकाने मागील चार वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी नोंदविली आहे. निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तारपूरकता
तर ५० गुणांखाली असल्यास आकुंचन दर्शवतो. निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग कमी झाला असला तरी रोजगार निर्मितीत मात्र वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक ठरली आहे.नवीन कार्यादेश आणि उत्पादनातील वाढ मार्च महिन्यात कमी झालेली आहे. बाजारपेठेतील आव्हानात्मक स्थिती, किमतीची दबाव आणि पश्चिम आशियातील युद्ध हे घटक यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरले आहेत. निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांवर किमतीचा दबाव वाढत असून, उत्पादनांच्या किमतीतील वाढ तुलनेने कमी आहे. अनेक कंपन्यांना नवीन ग्राहक मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र, मार्च महिन्यात बाह्य विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोप, जपान, आखाती देश, तुर्की आणि व्हिएतनाममधून ही वाढ झाली आहे, असे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.
देशाच्या पीएमआय निर्देशांकाने गेल्या महिन्यात जून २०२२ नंतरची नीचांकी पातळी गाठली आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला असून, त्याचा परिणाम देशातील निर्मिती क्षेत्रावर होत आहे. ॲल्यमुनियम, रसायने आणि इंधन यासह इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी
