Investors Using Margin Trading Funding: देशांतर्गत शेअर बाजाराने २०२५ मध्ये माफक परतावा दिला असला तरी, मार्जिन फंडिंग सुविधेचा वापर करून गुंतवणूकदारांचे जोखीम पत्करण्याचे प्रमाण या वर्षात विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. ब्रोकर्सकडून गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या अल्प मुदतीच्या कर्जाला मार्जिन ट्रेडिंग फंडिंग सुविधा म्हणतात.

प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० यांनी अनुक्रमे ९% आणि १०.५% च्या वाढीसह वर्षाचा शेवट केला. त्याच वेळी मार्जिन ट्रेडिंग फंडिंग सुविधेमध्ये (MTF) डिसेंबरमध्ये वार्षिक ४४% वाढ होऊन ती १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.

भारतीय गुंतवणूकदारांमध्ये लिव्हरेज्ड इक्विटी एक्सपोजरची वाढती भूक दिसून येत आहे, ज्यामुळे दोन वर्षांत मार्जिन ट्रेडिंग फंडिंगच्या उलाढालीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये हे प्रमाण ५७,०१८ कोटी रुपये होते.

एका देशांतर्गत ब्रोकरेज कंपनीच्या सीईओने सांगितले की, “मार्जिन पोझिशन्स वाढत आहेत कारण गुंतवणूकदारांना बाजारात अस्थिरता असूनही भीती वाटत नाही. त्यांना या परिस्थितीतही पैसे कमावण्याची संधी आहे असे वाटते, त्यामुळे ते बाहेर पडण्याऐवजी गुंतवणूक कायम ठेवत आहेत आणि खरेदीची सरासरी किंमत कमी करत आहेत.”

या मताशी सहमती दर्शवित एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ धीरज रेली म्हणाले की, “उच्च संपत्ती असलेले व्यक्ती, अनुभवी गुंतवणूकदार आणि उच्च-जोखीम पत्करणारे गुंतवणूकदार मार्जिन ट्रेडिंग फंडिंगचा लाभ घेऊन आपला परतावा वाढवण्याच्या संधींचा फायदा घेत आहेत.”

“फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या तुलनेत पारदर्शक आणि तुलनेने सुरक्षित लिव्हरेज (कर्ज) पर्याय असल्यामुळे मार्जिन ट्रेडिंग फंडिंगचा वापर वाढत आहे”, असे कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीपाल शाह यांनी सांगितले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, शेअर बाजारात लिव्हरेज (कर्ज) मिळवताना गुंतवणूकदार वैयक्तिक किंवा इतर कर्जांऐवजी मार्जिन ट्रेडिंग फंडिंगचा अधिकाधिक विचार करत आहेत.

गुंतवणूकदारांना मार्जिन ट्रेडिंग फंडिंग देण्यात आयसीआयसीआय सिक्युरिटीज (१८%) आणि कोटक सिक्युरिटीज (१५%) या दोन्ही कंपन्यांचा सर्वाधिक वाटा आहे. बाजारातील जवळपास एक तृतीयांश गुंतवणूकदार या दोन कंपन्यांकडून मार्जिन ट्रेडिंग फंडिंग घेतात.