Mark Zuckerberg Ireland Castle : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी आयर्लंडमध्ये मोठा रिअल इस्टेट व्यवहार केला आहे. वॉटरफोर्ड काउंटी येथे असलेला ‘स्ट्रॅनकॅली कॅसल’ हा ऐतिहासिक गॉथिक शैलीतील भव्य राजवाडा खरेदी केला आहे. या खरेदीसह ब्लॅकवॉटर नदीच्या काठावर पसरलेली ४४० एकरांची मालमत्ताही झुकरबर्ग यांच्या मालकीची झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या अग्रेसर असणाऱ्या मार्क यांनी राजवाडा खरेदी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या खरेदीमागे एक मार्क यांचे मोठं व्यावसायिक कारण लपलं आहे.
कसा आहे भव्यदिव्य राजवाडा?
१८३० च्या सुमारास माजी टोरी खासदार जॉन केली यांच्यासाठी हा भव्यदिव्य राजवाडा बांधण्यात आला होता. तब्बल १६,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेली तीन मजली भव्य इमारत गॉथिक वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. या राजवाड्याच्या स्वयंपाकघरातून जेवणाच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी जलद गतीने चालले तरी साडेचार मिनिटे लागतात. यावरुन या वास्तूच्या भव्यपणाचा अंदाज येऊ शकतो. प्रसिद्ध वास्तुविशारद जेम्स आणि जॉर्ज रिचर्ड पेन यांनी या राजवाड्याची डिझाइन तयार केली होती.
आयर्लंडच्या प्रॉपर्टी प्रायव्हेट रजिस्टरमध्ये या व्यवहाराची अधिकृत किंमत अद्याप नोंदवली गेली नसली, तरी ‘द आयरिश टाईम्स’च्या वृत्तानुसार या राजवाड्याची किंमत २ कोटी ते ३ कोटी युरो (सुमारे २२४ ते ३३६ कोटी भारतीय रुपये) दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजवाडा खरेदी करण्यामागे मेटाची रणनीती काय?
आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे असलेल्या मेटाच्या युरोपियन कार्यालयापासून या राजवाड्याचे अंतर सुमारे २०० किलोमीटर आहे. आयर्लंड हा मेटा साठी खूप महत्वाचा देश आहे. कंपनी येथे सुमारे १,५०० लोकांसह काम करते. अनेक मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांची युरोपीय कार्यालये आयर्लंडमध्येही आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून या वास्तूची खरेदी करण्यात आली आहे.
मार्क कुटुंबासह राजवाड्यात राहणार?
मेटाच्या प्रवक्त्याने ‘द आयरिश टाईम्स’ला दिलेल्या अधिकृत निवेदनात या बातमीला दुजोरा दिला आहे. “मार्क आणि त्यांचे कुटुंब या ऐतिहासिक वास्तूची काळजी घेण्यास उत्सुक आहेत. आयर्लंडमध्ये वेळ घालवण्यासाठी ते लवकरच येतील, जिथे मेटाचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय देखील आहे,” असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
कायमचे स्थलांतर नाही, कौटुंबिक सुट्टीचे ठिकाण
मार्क झुकरबर्ग आणि त्यांचे कुटुंब अमेरिकेतच वास्तव्यास राहणार असून, आयर्लंड दौऱ्यावर असताना किंवा सुट्ट्यांच्या काळात ते या राजवाड्याचा कौटुंबिक निवासस्थान म्हणून वापर करतील. आयर्लंडमधील मेटाच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर झुकरबर्ग यांचा हा व्यक्तिगत रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठा व्यवहार मानला जात आहे.
