scorecardresearch

बाजारातील माणसं : एच.टी. पारेख; मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा द्रष्टा

इतिहासाच्या पुस्तकाला पहिले पान नाही तर भांडवल बाजारावरील पुस्तकाला शेवटचे पान नसते, असे म्हटले जाते.

बाजारातील माणसं : एच.टी. पारेख; मध्यमवर्गीयांच्या गृहस्वप्नाला पंख देणारा द्रष्टा
एच.टी. पारेख

‘बाजारातील माणसं’ या साप्ताहिक लेखमालेत ज्यांनी भांडवली बाजाराकरिता महत्त्वाचे योगदान दिले अशा व्यक्तींचा धावता परिचय करून देणार आहोत. अमेरिकेच्या शेअर बाजारात काम करणाऱ्या घराण्यांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न दाखवले तर एच. एल. लखमीदास या शेअर दलालाच्या पेढीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने घर बांधणीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी स्थापन करता येईल आणि ती टिकाव धरून प्रगती करेल, असे स्वप्न बघितले. स्वप्नाचा आयुष्यभर पाठपुरावा केला. चंद्रावर माणसाचे पाऊल पडणे ते त्या काळात जेवढे अशक्य कोटीतले होते, त्याचप्रमाणे घरासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था चांगली चालू शकेल यावरही त्याकाळी कोणी विश्वास ठेवला नव्हता. एच. टी. पारेख मात्र या संकल्पनेने झपाटलेले होते.

गुजरातमध्ये रांडेर येथे १० मार्च १९११ रोजी त्यांचा जन्म झाला. १९३२ ला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषय निवडून त्यांनी पदवी मिळवली आणि १९३६ ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला बँकिंग ॲण्ड फायनान्स हा विषय घेऊन ते बी.एस्सी झाले. भारतात परतल्यानंतर शेअर दलालाच्या पेढीवर नोकरी करत असताना आणि महाविद्यालयात शिकवताना आयसीआय या संस्थेमध्ये १९५६ मध्ये ते उपव्यवस्थापक म्हणून रुजू झाले. पुढे १९७२ ते १९७८ या कालावधीत ते या संस्थेचे अध्यक्ष झाले. ऑक्टोबर १९७७ ला एचडीएफसीची स्थापना झाली. १९७८ मध्ये समभागांची विक्री झाली. शंभर रुपये दर्शनी मूल्याचा समभाग त्याच किमतीला विक्रीला होता. या समभाग विक्रीला जेमतेम प्रतिसाद मिळाला. भांडवली बाजारात सुरुवातीला या संकल्पनेवर कोणाचाही विश्वास नव्हता, म्हणूनच समभागांची दर्शनी मूल्यांपेक्षा कमी किमतीला विक्री झाली.

गृहनिर्माण क्षेत्राला तेव्हा कोणत्याही बँका कर्ज देण्यास तयार नव्हत्या. भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) एलआयसी हाऊसिंग ही सोसायट्यांना कर्ज देणारी संस्था होती. मात्र वैयक्तिक ग्राहकाला कर्ज देणे हे काम एचडीएफसीने सर्वप्रथम सुरू केले. निवृत्त झाल्यानंतर म्हातारपणी घर बांधून त्याला पितृछाया किंवा मातृछाया नाव द्यायचे. त्यासाठी निवृत्तीच्या वेळेस मिळणारी रक्कम वापरायची आणि त्याचबरोबर नातलगांकडून उसने पैसे घेऊन कर्ज घेऊन घर बांधण्याचा प्रघात त्यावेळी होता.

एचडीएफसीने सर्वप्रथम नोकरदार वर्गाला पगाराच्या उत्पन्नावर कर्ज द्यायला सुरुवात केली. कर्जाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर कर्जाचा परतफेडीच्या हप्त्यामुळे संस्था वेगाने मोठी झाली. एचडीएफसी लिमिटेडची प्रगती कशी होत गेली हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. काकांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा पुतण्या दीपक पारेख यांनी एचडीएफसीला शिखरावर नेऊन पोहोचविले.

अर्थशास्त्राची कालची पुस्तके आज वाचून उद्याच्या समस्येवर उत्तर शोधणे हे योग्य नाही. त्याऐवजी नवीन विचार करायला हवा, असे पारेख यांचे म्हणणे होते. म्हणून ते पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते तर व्यावहारिक अर्थतज्ज्ञ होते. या माणसाने भांडवली बाजाराच्या विविध प्रश्नांवर खूप विपुल लिखाण करून ठेवले आहे. १९६० मध्येच ते भांडवली बाजार सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला पाहिजे असे सतत सांगायचे. एचडीएफसीकडे असलेल्या ठेवींवरील व्याजाला तत्कालीन प्राप्तिकर कायद्याच्या ‘८० एल’ या कलमानुसार १५ हजार रुपयांपर्यतच्या व्याज रकमेवर प्राप्तिकर सवलत मिळत होती. गेली ४५ वर्षे या संस्थेचा विकास वेगवगेळ्या नात्याने जवळून बघितला आणि अनुभवला आहे. पारेख हे सतत वेगवगेळ्या विषयांवर व्याख्याने देत होते.

भारतात इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्युच्युअल फंड स्थापन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा पैसा भांडवली बाजारात आला पाहिजे असे त्यांनी त्यावेळी ठामपणे सांगितले. सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सक्ती चॅरिटेबल ट्रस्टना केली जाते. ट्रस्ट कायद्यामध्ये गुंतवणुकीसंदर्भात असलेले नियम बदलले पाहिजे हे त्या काळात सांगणे अतिशय धाडसाचे होते. हे धाडस त्यांनी त्या काळात दाखविले आणि म्हणूनच ‘बाजारातील माणसं’ या मालिकेत एच.टी. पारेख यांच्यावरील हा पहिला लेख.

– प्रमोद पुराणिक (लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

मराठीतील सर्व अर्थभान ( Business ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या