मुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांत घसरण कायम असून, पडत्या रुपयाला तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ३० अब्ज डॉलर खर्च केले जाऊ शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गत दोन दिवसांत याच शक्यतेने डॉलरमागे ८३.३२ या ऐतिहासिक तळ गाठलेल्या रुपयाला काहीसे सावरता आले असून, गुरुवारच्या सत्रात तो ८३.०६ पातळीवर स्थिरावताना दिसला आहे.
रुपयाला सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर रिझर्व्ह बँकेकडून खर्ची घातले जातील, अशी शक्यता जर्मनीच्या डॉईशे बँकेने वर्तवली आहे. असे करून देखील रिझर्व्ह बँकेकडे ५९४ अब्ज डॉलरची राखीव गंगाजळी शिल्लक राहील, जी दहा महिन्यांच्या आयातीच्या समतुल्य आहे, असे या विदेशी बँकेने म्हटले आहे. रुपयाने डॉलरच्या तुलनेत रुपयाने सोमवारच्या सत्रात ८३.३२ या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. परिणामी रुपयाला बळ देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन बाजारात हस्तक्षेप केला गेल्याचे म्हटले जात आहे. परिणामी बुधवारच्या सत्रात रुपयाच्या विनिमय मूल्याने २१ पैशांचे, तर गुरुवारी आणखी ५ पैशांचे बळ कमावले.
हेही वाचा >>>व्याजदर वाढीच्या भीतीने ‘सेन्सेक्स’मध्ये आठ शतकी घसरण, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; निफ्टी २० हजारांखाली
किरकोळ महागाई दर ऑगस्टमध्ये ६.८ टक्के नोंदवण्यात आला, जो सप्टेंबरमध्ये ५ टक्क्यांपर्यंत नरमण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमतीतील घसरणीमुळे महागाई कमी होण्याची आशा आहे. मात्र खनिज तेल ९५ डॉलरपर्यंत भडकल्याने महागाईविरोधातील लढाईत पुन्हा पीछेहाट होण्याची शक्यता आहे. तेल भडक्याने रुपयाच्या मूल्यावरही अतिरिक्त ताण येणे अपेक्षित आहे.