80 percent stocks in loss despite Nifty 50 near record high: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० विक्रमी उच्चांकाच्या आसपास असला तरी प्रत्यक्षात बाजाराचे चित्र मात्र वेगळीच गोष्ट सांगत आहे. कारण १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल असलेल्या सुमारे ८० टक्के शेअर्समध्ये सप्टेंबर २०२४ पासून मंदी आहे. म्हणजेच निफ्टी निर्देशांक मजबूत दिसत असला तरी हे ८० टक्के शेअर्स त्यांच्या अलीकडील उच्चांकावरून मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
या परिस्थितीत आता अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे भू-राजकीय तणाव निर्माण झाला आहे. यामुळे सोमवारी सेन्सेक्स १,००० अंकांपेक्षा जास्त घसरला होता, तर निफ्टी २४,९०० च्या खाली बंद झाला होता. या दोन्ही निर्देशांकांमध्ये आजही घसरण सुरूच आहे.
गेल्या १८ महिन्यांपासून शेअर बाजार सततच्या विक्रीमुळे आधीच कोसळलेला आहे, अशात आता बाजाराला कच्च्या तेलाच्या धक्क्याचा आणि मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या भीतीचा सामना करावा लागत आहे.
यामुळे गुंतवणूकदारांसमोर आता बाजारातून गुंतवणूक काढून घ्यायची की संधी ओळखून आणखी गुंतवणूक वाढवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
मूळ ‘बेअर मार्केट’च्या (मंदीच्या) प्रश्नाकडे वळताना अरुण गिरी यांचा सल्ला स्पष्ट आणि रोखठोक आहे. ते म्हणाले, “ही वेळ बाजाराचा तळ (बॉटम) शोधत बसण्याची नसून भांडवल गुंतवण्याची आहे.”
यातील आव्हान मान्य करताना ते म्हणाले, “या दृष्टिकोनासाठी तात्पुरता आणि केवळ कागदावर दिसणारा तोटा पचवण्यासाठी संयमी वृत्तीची गरज लागेल.”
परंतु त्यांचा असा तर्क आहे की आकर्षक फ्री कॅश फ्लो आणि पेआउट यील्डसोबतच उच्च वाढीची क्षमता असलेल्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. “चांगले मूल्यांकन असलेले निवडक शेअर्स शोधणाऱ्यांसाठी हा उत्साहाचा काळ आहे”, असेही त्यांनी नमूद केले. याबाबत इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात उल्लेख आहे.
‘मोनार्क एआयएफ’ देखील या मताशी सहमत आहे. त्यांच्या मते, निवडक शेअर्ससाठी ‘रिस्क-रिवॉर्ड’ आता अनुकूल झाला आहे, जो साधारणपणे मंदीचा काळ संपत आल्यावरच पाहायला मिळतो.
अनुभवी गुंतवणूकदार काय करत आहेत?
मुख्य निर्देशांक कदाचित तुम्हाला बाजार मंदीत असल्याचे सांगणार नाहीत, पण ८०% भारतीय शेअर्ससाठी मंदी आधीच आली आहे. म्हणूनच दलाल स्ट्रीटवरील काही अनुभवी दिग्गज आता शांतपणे गुंतवणूक करू लागले आहेत.
