लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: मंगळवारच्या सत्रात भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाल्यानंतर प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी जोरदार पुनरागमन करत भरपाई केली. भांडवली बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका सत्रात १३.२२ लाख कोटी रुपयांची भर पडली. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षेनुरूप जागा न मिळाल्याने सेन्सेक्समध्ये मतमोजणीच्या दिवशी ६,००० अंशांपर्यंत पडझड झाली होती.

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २,३०३.१९ अंशांनी म्हणजेच ३.२० टक्क्यांनी वधारून ७४,३८२.२४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २,४५५.७७ अंशांची कमाई करत ७४,५३४.८२ अंशांच्या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी १३,२२,८४७.०५ कोटी रुपयांनी वधारून ४०८.०६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मतदानोत्तर चाचणी-पूर्व शुक्रवारच्या बंद पातळीला निर्देशांकाने पुन्हा काबीज केले. मंगळवारी निकाल धास्तीने सेन्सेक्सच्या सहा टक्क्यांहून मोठ्या आपटीसह, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३१.०७ लाख कोटी रुपयांनी घसरून ३९४.८३ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते.

हेही वाचा >>>मतदानोत्तर अंदाजातून कमावलेले, मतमोजणीनंतर गमावले; सेन्सेक्स-निफ्टीची सहा टक्क्यांनी आपटी

विद्यमान केंद्र सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नसले तरी मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापता येणे सहज शक्य आहे. परिणामी राजकीय स्थिरता हमखास दिसत असल्याने भारतीय भांडवली बाजारात विविध क्षेत्रांमध्ये व्यापक खरेदीमुळे आधीच्या सत्रातील काही नुकसान भरून निघू शकले. मात्र, नवीन सरकारच्या स्थापनेवर आणि रिझर्व्ह बँकेच्या आगामी धोरण बैठकीवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील, असे निरीक्षण जिओजितचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या सर्व ३० कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. इंडसइंड बँकेच्या समभागाने सुमारे ८ टक्क्यांनी उसळी घेतली. टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स, कोटक महिंद्र बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर एनटीपीसी, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो आणि पॉवर ग्रिडच्या समभागात मोठी घसरण झाली.