हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध पात्र आणि मुन्नाभाईचा उजवा हात म्हणजे ‘सर्किट’ आणि तोच ‘सर्किट’ गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत होता. अर्शद वारसीने २ मार्च २०२३ ला समाजमाध्यम ‘एक्स’वर एक पोस्ट लिहून सर्वांना धक्काच दिला. कारण त्याच्या सगळ्या पोस्ट बघितल्या तर फक्त चित्रपटाच्या संबंधित असायच्या. मात्र यावेळेस त्याचा रोख साधना नावाच्या एक घोटाळ्याकडे होता, ज्यावर सेबीने बंदी आणली होती. हा घोटाळा ‘पंप अँड डंप’ या प्रकारात मोडत होता. ज्यात साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट नावाच्या कंपन्यांचा समावेश होता. पूर्वी फक्त काहीतरी अफवा उठवून समभागांचे भाव कृत्रिमरीत्या फुगवले जायचे. पण या घोटाळ्यात अफवा उठवण्यासाठी वापर करण्यात आला तो ‘यूट्यूब’सारख्या समाजमाध्यमाचा. जुलै २०२२ मध्ये काही समाजमाध्यमांवर अशी बातमी पसरायला सुरुवात झाली की, या कंपन्यांचे अतिशय उज्ज्वल भविष्य असून त्यांना परदेशात नवनवीन संधी उपलब्ध असून कंपन्यांचा विस्तार होणार आहे. अशा जाहिरातींना भुलून गुंतवणूकदार या कंपन्यांकडे वळले. अर्थातच या जाहिराती फसव्या होत्या आणि जाहिरातींपूर्वी ज्यांच्याकडे समभाग होते ते त्यांनी उच्च भावात विकले. घोटाळ्याचा मुन्नाभाई होता कंपनीचा प्रवर्तक गौरव गुप्ता. ज्याने या घोटाळ्यात ७ कोटींचा नफा कमावला. त्याचे काही मित्र आणि हितचिंतक देखील घोटाळ्यात सहभागी होते. त्यातच होता मुन्नाभाई मधील ‘सर्किट’ म्हणजेच अर्शद वारसी. अर्शदची पत्नी मारिया गोराटी आणि भाऊ इकबाल वारसी यांनी सुमारे ७० लाखांचा नफा कमावला. या सगळ्या लोकांनी मिळून साधना ब्रॉडकास्टमध्ये सुमारे ४२ कोटींचा घोटाळा केला आणि शार्पलाइन ब्रॉडकास्टमध्ये १२ कोटींचा. फक्त ‘सर्किट’ यात सामील होता म्हणून याची सगळीकडे अधिक चर्चा झाली. या आदेशाद्वारे ‘सेबी’ने सर्वांना नफ्याची रक्कम तर जमा करायला सांगितलीच, पण त्यांना भांडवली बाजारात व्यवहार करण्याससुद्धा मनाई करण्यात आली. हेही वाचा - ‘सेन्सेक्स’ची फेरमुसंडी; अमेरिकी ‘जीडीपी’ वाढीने १,२९२ अंशांची कमाई अर्शद वारसीने घोटाळ्याशी आपला कुठलाही संबंध नाही असे समाजमाध्यमातून सांगितले आणि आपण घोटाळेबाज नसून आपण या घोटाळ्याचे बळी आहोत आणि आर्थिक नुकसान झेलले आहे असेही सांगण्याचा प्रयत्न केला. ‘सेबी’ने आपल्या आदेशात या सगळ्यांचे कसे हितसंबंध गुंतले होते आणि त्यांच्या दूरध्वनीचे काही तपशीलसुद्धा दिले. आदेशात प्रवर्तक चमूने, महत्त्वाची व्यवस्थापकीय पदे सांभाळणाऱ्या व्यक्तींनी आणि इतरांनी आपला हिस्सा वाढीव भावात विकून कसा पद्धतशीरपणे कमी केला याची विस्तृत माहिती दिली आहे. मनीष मिश्रा या यूट्यूब चालवणाऱ्या एका आरोपीचे बँक खाते देखील तपासण्यात आले, ज्यात या खोट्या व्हिडीओचा प्रचार करण्यासाठी ‘गूगल’ला तब्बल ६४ लाख रुपये दिल्याचेही स्पष्ट झाले. हेही वाचा - दीडशे वर्षांची चिरतरुण मिनीरत्न बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड अर्थात मार्च २०२३ मधील या आदेशाला आव्हान देण्यात आले आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘सेबी’च्या अपिलीय न्यायालयाने थोडासा दिलासा ‘सर्किट’ला देत पुढील सहा महिन्यांमध्ये हा तपास संपवण्याचे आदेश दिले. नंतर मार्च २०२४ मध्ये अशी बातमी आली की, काही महिन्यांपूर्वी ‘सर्किट’ला नवीन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यात या ‘यूट्यूब चॅनेल’ चालवणाऱ्या व्यक्तीबरोबरचे ‘व्हॉट्सॲप’ संभाषणसुद्धा देण्यात आले आहे आणि त्याची माहिती आता तपासकर्ते गोळा करत असल्याचे कळते. म्हणजे दिवा पेटवणारे ‘सर्किट’ या निमित्ताने पूर्ण होऊन दिवा पेटणार की ‘सर्किट ब्रेकर’मुळे सिनेमातल्या ‘सर्किट’ची निर्दोष मुक्तता होणार ते येणारा काळच ठरवेल.