सुमारे २० वर्षे सीएलएसए या संस्थेत काम केल्यानंतर ५ वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर वुड जेफरीज या संस्थेकडे आले. ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी या पदावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.

आर्थिक पत्रकार ते गुंतवणूक विश्लेषक अशाप्रकारे त्यांच्या कामात बदल होत गेले म्हणून त्यांचा प्रवास अतिशय रोमहर्षक आणि अभ्यास करण्यासारखा आहे. वर्ष १९८२ ते १९८४ हाँगकाँगच्या फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यूसाठी त्यांनी काम केले. वर्ष १९८४ ते १९९६ द इकॉनॉमिस्टसाठी त्यांनी काम केले. इकॉनॉमिस्टमध्ये काम करताना ते न्यूयॉर्क, टोकियो ब्युरो चीफ म्हणून त्यांनी काम केले. ख्रिस्तोफर वुड यांचे काम फार मोठे आहे. त्यांच्या पूर्ण कामाचा आढावा थोडक्यात घेणे फार कठीण आहे. बाजारावर त्यांचे प्रभुत्व आहे. आर्थिक पत्रकारिता केलेली असल्याने आणि करत असल्याने त्यांच्याकडे अनेक देशांची आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोळा केलेली प्रचंड आकडेवारी आहे. आकडेवारी फक्त असणे हे महत्त्वाचे नाही तर त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यावरून वेगवेगळ्या देशांच्या शेअर बाजारात गुंतवणुकीच्या काय संधी उपलब्ध आहे हे सांगण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम मिळवण्याचे काम सहज केले.

हेही वाचा…पाकिस्तानी बायकोच्या सहभागाचा घोटाळा

वर्ष १९९६ पासून ते साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करतात. त्या अहवालचा मथळा ग्रीड ॲण्ड फिअर असा आहे. हा मथळा सर्वकाही सांगून जातो. फक्त लिखाण नाही तर जगभर व्याख्याने देणे, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि त्यातून कोणकोणत्या देशात कोणकोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला हवी हे सांगणे अशी या व्यवसायात असंख्य आव्हाने समोर असतात. सल्ला चुकला तर प्रहार लगेचच मिळतात, पण सल्ला योग्य मिळाला आणि त्यामुळे एखाद्या संस्थेला पैसा मिळाला तर हारसुद्धा गळ्यात पडतात असा हा व्यवसाय आहे.

सुमारे २० वर्षे सीएलएसए या संस्थेकडे काम केल्यानंतर ३१ मे २०१९ ला जेफरीज या दलाली पेढीकडे येण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कारणसुद्धा महत्त्वाचे आहे. वर्ष २०१३ ला चीनच्या सायटीक सिक्युरिटीजने सीएलएसए विकत घेतली. यामुळे ६ उच्च पदस्थ सोडून गेले. ख्रिस्तोफर वुड यांनीसुद्धा सीएलएसए सोडली. म्हणून महेश नांदुरकर यांनीदेखील सीएलएसए सोडून ते जेफरीजकडे आले. महेश नांदुरकर यांच्यावर गेल्यावर्षी याच स्तंभात लिखाण केलेले आहे. (२४ एप्रिल २०२३ च्या अंकात) ख्रिस्तोफर वुड यांची भेट झाली तेव्हा आमच्या गावचा माणूस तुम्हाला अगोदरसुद्धा मदतनीस होता आणि आताही आहे, असे सांगितल्यानंतर त्यांनी आश्चर्याने कोण हा प्रश्न विचारला. नांदुरकर नाव सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. लिखाण करताना कोण कोणाचा कोण हे लक्षात ठेवावेच लागते.

हेही वाचा…Stock Market Today : ‘ब्लूचिप’ कंपन्यांमधील खरेदीच्या जोमाने निफ्टी नव्या उंचीवर

ख्रिस्तोफर वुड यांनी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत
१) बूम ॲण्ड बस्ट
२) दि राईज अँण्ड फॉल ऑफ द वर्ल्ड फायनान्शियल मार्केट (१९८९)
आणि १९९२ ला ३) द बबल इकॉनॉमी जपान हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामध्ये प्रामुख्याने जपानच्या अर्थव्यवस्थेविषयी आणि भांडवली बाजाराविषयी लिखाण आहे. द एन्ड ऑफ जपान इन कॉर्पोरेटेड ॲण्ड हाऊ द न्यू जपान विल लुक अशी महत्त्वाची आणखी काही पुस्तके त्यांची आहेत. मे २०२४ मध्ये चीनबद्दल त्यांचे मत बदलले तर आपला विचार बदलला हे सांगण्याचे धाडस त्यांना होते.

एखादी घटना घडल्यानंतर मग अनेक पुस्तके प्रकाशित होतात. वर्ष २००८ ला अमेरिकेत जे घडले त्या विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली. पण ख्रिस्तोफर वुड यांचे विचार महत्त्वाचे आहेत, कारण वर्ष २००७ ला अमेरिकेवर संकट येणार आहे, अशी त्यांनी पूर्ण कल्पना दिली होती, परंतु त्यावेळेस कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही.

हेही वाचा…बाजार रंग: निवडणूक निकाल, मृगाचा पाऊस आणि महागाई

आता वेळोवेळी भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय भांडवल बाजार याविषयी त्यांची मते, त्यांचे विचार ते प्रसिद्ध करत असतात. मात्र अनुभव असा आहे की, कौतुक करणारे विचार मांडले तर ते लोकप्रिय होतात. अप्रिय विचार मांडले किंवा अर्थव्यवस्थेविषयी काही शंका उपस्थित केल्या की, तो माणूस नावडता होतो. मोदी पुन्हा निवडून आले नाही तर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण होईल असे विचार त्यांनी व्यक्त केल्यानंतर बाजारात भीती निर्माण झाली होती, त्यावेळेस भारतीय भांडवली बाजाराचा सतत अभ्यास असलेले आणि बाजारात प्रचंड तेजी येईल असे सांगणारे अनेक विश्लेषक होते. त्यामुळे ख्रिस्तोफर वुड यांचे विचार पचनी पडले नाही. मात्र आपल्याला जे आकडेवारीवरून समजते, ते बोलून मोकळे व्हायचे असे वुड यांच्याबाबत आतापर्यत घडलेले आहे .

परदेशी वित्तसंस्थाच्या हातात आपला बाजार आहे. त्यांनी जर समभाग खरेदी केले तर बाजार वाढतो आणि त्यांनी विक्री केली तर बाजार पडतो. ख्रिस्तोफर वुडसारखे विश्लेषक परदेशी वित्त संस्थांना वेळोवेळी तेजी किंवा मंदीचे सल्ले देत असतात. त्यामुळे बाजारात अशा माणसांचेसुद्धा महत्त्वाचे स्थान आहे.

हेही वाचा…क..कमॉडिटी चा : भारत अजूनही ‘कृषिप्रधान’ देश आहे !

जेफरीज या पेढीतर्फे शेअरची नावे प्रसिद्ध केली जातात, की अमुक शेअरमध्ये फक्त तेजीच बघायला मिळणार आहे. मात्र वैयक्तिक गुंतवणूकदारांनी काय करायचे हा विषय पूर्ण वेगळा आहे. बाजारात अशाप्रकारे सल्ले देणारे संस्था, व्यक्ती असतात. त्यांचा सल्ला बाजारावर परिणाम करतो. म्हणून त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करायचे नसते. या संस्थांना कंपन्यांकडून कंपनीच्या पुढच्या भावी योजना यांची भरपूर माहिती उपलब्ध होत असते. जी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड पर्याय योग्य ठरतो.