scorecardresearch

Premium

व्याजदर वाढीच्या भीतीने ‘सेन्सेक्स’मध्ये आठ शतकी घसरण, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; निफ्टी २० हजारांखाली

अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर वाढीचे चक्र सुरू केले जाण्याच्या शक्यतेने देशाअंतर्गत भांडवली बाजारात बुधवारी मोठी पडझड झाली.

decline in Sensex
व्याजदर वाढीच्या भीतीने ‘सेन्सेक्स’मध्ये आठ शतकी घसरण, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; निफ्टी २० हजारांखाली (image – financial express)

मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर वाढीचे चक्र सुरू केले जाण्याच्या शक्यतेने देशाअंतर्गत भांडवली बाजारात बुधवारी मोठी पडझड झाली. अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर १६ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने आणि जागतिक बाजारात खनिज तेलाच्या तापलेल्या किमतीने गुंतवणूकदारांची धास्ती वाढवली. बाजारातील समभाग विक्रीच्या सपाट्याने गुंतवणूकदारांना बुधवारच्या सत्रात तब्बल २ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

जागतिक बाजारातील प्रतिकूल घडामोडींमुळे प्रमुख जिनसांच्या किमतीदेखील महागण्याची शक्यता असून एकंदर आटोक्यात असलेल्या चलनवाढ पुन्हा फणा काढण्याची चिंताही वाढली आहे. या नकारात्मक घटकांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी देशाअंतर्गत भांडवली बाजारातून निधी काढून घेण्यास सुरुवात केली. ज्याचा प्रामुख्याने निर्देशांकांमध्ये वजनदार स्थान असणाऱ्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या आघाडीच्या समभागांना फटका बसला. सेन्सेक्स-निफ्टीच्या पडझडीत त्यांचेच सर्वाधिक योगदान राहिले.

News About Heart Attack
तिशीतील तरूणांमध्ये हृदयविकाराचा वाढता धोका!
export duty
मोदी सरकारने निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेंतर्गत दिले जाणारे सहाय्य ‘या’ तारखेपर्यंत वाढवले
janhavi kandula
जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी सिएटलमध्ये मोर्चा
gdp 1
फिचकडून ६.३ टक्के वाढीचा अंदाज कायम, वर्षा अखेरीस महागाई वाढण्याची शक्यता

हेही वाचा – पक्की जोडणी सदा सर्वदा !… ज्योती रेझिन्स ॲण्ड अधेसिव्ह लिमिटेड

सेन्सेक्समध्ये बुधवारच्या सत्रात ७९६ अंशांनी घसरून ६६,८००.८४ पातळीवर बंद झाला. सत्रांतर्गत त्याने ८६८.७ अंश गमावत ६६,७२८.१४ या दिवसातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३१.९० अंशांची घसरण झाली आणि तो २० हजार अंशांखाली १९,९०१.४० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेच्या समभागात ४ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टाटा स्टील, विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयटीसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग वधारले.

हेही वाचा – रोखे म्युच्युअल फंडांना ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटींची गळती

जागतिक मध्यवर्ती बँकांनीही एकूण मंदीच्या संभाव्यतेमध्ये भर घातली आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँकेसह, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानची विद्यमान आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. शिवाय व्याजदर पुन्हा वरच्या दिशेने वाढविले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वाढत्या अमेरिकी रोखे उत्पन्नामुळे आणि फेडच्या संभाव्य व्याजदर वाढीचे धोरण आणि वाढत्या खनिज तेलाच्या किंमतींनी बाजारावर मंदीवाल्यांचा पगडा नजीकच्या काळात राहील. देशाअंतर्गत आघाडीवर बँक निफ्टीमधील घसरणीने बाजाराच्या कामगिरीवर परिणाम केला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decline in sensex due to fear of interest rate hike print eco news ssb

First published on: 20-09-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×