गुंतवणूकदारांनी सलग दोन सत्रातील घसरणीनंतर धातू, दूरसंचार आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी शुक्रवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर स्थिरावले. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, महिंद्र अँड महिंद्र या वाहन निर्माता कंपन्यांच्या प्रवासी वाहनांची घाऊक विक्री आणि जीएसटी संकलन मे महिन्यात सलग तिसर्या महिन्यात १.५० लाख कोटींपुढे कायम असल्याने बाजाराचा आशावाद वाढवला आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११८.५७ अंशांनी वधारून ६२,५४७.११ स्थिरावला. दिवसभरात त्याने २९१.३ अंशांची भर घालत ६२,७१९.८४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीने ४६.३५ अंशांची कमाई केली आणि तो १८,३५४.१० पातळीवर स्थिरावला. सरलेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात अस्थिर वातावरण होते. मात्र जागतिक सकारात्मक संकेतांसह देशांतर्गत आघाडीवर देखील आशादायी वातावरण होते. मे महिन्यातील वाहन विक्रीच्या दमदार आकडेवारीमुळे वाहन निर्मिती कंपन्यांचे समभागात गुंतवणूकदारांनी खरेदी केली. परिणामी बाजारात एकूणच गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीबाबत नरमाईचे धोरण घेण्याच्या आशेने जागतिक भांडवली बाजारांना दिलासा दिला आहे.




मुंबई शेअर बाजारात टाटा स्टीलचा समभाग आघाडीवर होता, त्यात २ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ मारुती, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, टायटन, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, आयटीसी, स्टेट बँक आणि नेस्ले यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली.
हेही वाचाः मुकेश अंबानींच्या रिलायन्सला मागे टाकत ‘ही’ कंपनी बनली देशातील नंबर वन
सेन्सेक्स ६२,५४७.११ +११८.५७ (०.१९)
निफ्टी १८,३५४.१० +४६.३५ (०.२५)
डॉलर ८२.३१ -९
तेल ७५.५७ +१.७४