Godfrey Phillips Share Price: एकीकडे शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी विक्री होत असताना, दुसरीकडे गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बाजाराचे कामकाज संपले तेव्हा कंपनीचा शेअर जवळपास १७ टक्क्यांनी वाढून ७,०११ रुपये प्रति शेअरवर पोहचला होता. यापूर्वी शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी, कंपनीचा शेअर २०% ने वाढला होता. अशाप्रकारे, गेल्या २ ट्रेडिंग दिवसांत कंपनीचा शेअर सुमारे ४० टक्क्यांनी वाढला आहे.

डिसेंबर तिमाहितील कंपनीची कामगिरी

फोर स्क्वेअर आणि मार्लबोरोसह अनेक प्रसिद्ध सिगारेट ब्रँडचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या गॉडफ्रे फिलिप्स कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर झाली आहे. कंपनीने सांगितले की डिसेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा ४८.७ टक्क्यांनी वाढून ३१५.९ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत २१२.४ कोटी रुपये होता. कंपनीने पुढे सांगितले की, डिसेंबर तिमाहीत त्यांचा महसूल २७.३ टक्क्यांनी वाढून १,५९१.२ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १,२४९.६ कोटी रुपये होता.

गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअरची किंमत

दुपारी ३.३० वाजता, बाजार बंद झाला तेव्हा गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर एनएसईवर १६.८६% वाढून प्रति शेअर ७,०११ रुपयांवर पोहचला होता. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे ५७.८५% वाढ झाली आहे. तर, गेल्या एका वर्षात कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना १५८% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

कंपनीची शेअरहोल्डिंग

कंपनीची शेअरहोल्डिंग डिसेंबर तिमाहीत जवळजवळ स्थिर राहिली आहे. प्रमोटर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झाला नाही. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) त्यांचा हिस्सा १०.८ टक्क्यांवरून १०.६ टक्क्यांपर्यंत कमी केला. दुसरीकडे, म्युच्युअल फंड्सनी डिसेंबर तिमाहीत त्यांचा हिस्सा मागील तिमाहीतील १.७८ टक्क्यांवरून १.८ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

गॉडफ्रे फिलिप्स इंडिया ही भारतातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी स्टॉक बीएसई५०० निर्देशांकाचा भाग आहे. ही कंपनी फोर स्क्वेअर, रेड अँड व्हाइट, कॅव्हेंडर्स, स्टेलर, फोकस, ओरिजिनल्स इंटरनॅशनल आणि इतर सिगारेट ब्रँडसाठी ओळखली जाते. याशिवाय, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया फिलिप मॉरिससोबतच्या कराराखाली भारतात जागतिक सिगारेट ब्रँड, मार्लबोरोचे उत्पादन आणि वितरण देखील करते.

Story img Loader