Union Budget Effect On Share Market: जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाल्यामुळे एमसीएक्स, हिंदुस्तान झिंक, वेदांत, मुथूट फायनान्स, मणप्पुरम, आयआयएफएल फायनान्स यासारख्या मौल्यवान धातूंशीसंबंधित व्यवहार करणाऱ्या कंपन्यांचे शेअर बाजार खुला होताच १५ टक्क्यांपर्यंत घसरले
एमसीएक्सवर चांदीने प्रतिकिलो २.७४ लाख रुपयांवरून व्यवहाराला सुरुवात केली, शुक्रवारच्या प्रतिकिलो २.९२ लाख रुपयांच्या तुलनेत त्यात ६ टक्के घसरण झाली, तर एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रतितोळा १.४३ लाख रुपयांवर सुरू आहे, शुक्रवारच्या सत्रात भाव प्रतितोळा १.४९ लाख रुपये नोंदवला गेला होता.
रविवारी अर्थसंकल्पामुळे सुरू असलेल्या भांडवली बाजारात एमसीएक्सचे शेअर १५ टक्क्यांनी घसरून २,१४८.८ रुपयांवर व्यवहार करत होते तर हिंदुस्तान झिंकचा शेअर १० टक्के घसरून ५६५.६५ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या सहा वर्षांतील एमसीएक्सच्या शेअरमध्ये झालेली ही सर्वात मोठी एका सत्रातील घसरण आहे.
दरम्यान, वेदांताचे शेअर ७ टक्क्यांनी घसरून ६३५.३५ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते आणि मुथूट फायनान्स, मणप्पुरम, आयआयएफएल फायनान्स सारख्या सोन्याच्या वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे शेअर अनुक्रमे ६ टक्के, ३.४ टक्के, ३.३ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार सुरु केले.
हिंदुस्तान झिंक ही भारतातील चांदीची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे आणि वेदांत तिचे मुख्य प्रवर्तक आहे. अलिकडेच वेदांतने हिंदुस्तान झिंकमधील १.६ टक्के हिस्सा विकण्यासाठी ओएफएस जाहीर केला आहे. दोन दिवसांच्या घसरणीत हिंदुस्तान झिंकचे बाजार भांडवल ६३,००० कोटी रुपयांनी कमी झाले तर याच काळात वेदांताचे बाजार भांडवल ५४,००० रुपयांनी घसरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना पुढील फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याच्या वृत्तानंतर शुक्रवारी अमेरिकी डॉलर वाढला आणि गुंतवणूकदारांनी नफा मिळवला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. त्याआधी शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे.

