श्रीकांत कुवळेकर

कमॉडिटी बाजारातील अनिश्चितता किंवा लहरीपणा आपण नेहमीच अनुभवत असतो. मागील आठवड्यात बाजारावर टांगत्या तलवारीसारखी असलेली एक मोठी अनिश्चितता दूर झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यानुसार अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपल्या पतधोरणात पाव टक्क्याची वाढ केली असली तरी मागील दीड वर्षाहून अधिक काळ चालू असलेले व्याजदर वाढीचे चक्र थांबवण्याचे संकेतही दिले आहेत. मागील काळात केलेल्या व्याजदर वाढीमुळे अमेरिकेतील महागाई आणि रोजगार यांच्या वाढीच्या दरात नरमाई येत असल्यामुळे व्याजदर यापुढे स्थिर राहतील. शिवाय नंतर ते खाली आणण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे. व्याजदर वाढीचे मळभ दूर झाल्यामुळे मंदीसाठी जबाबदार असलेला मोठा घटक दूर होऊन पाठोपाठ अमेरिकी बाजारात जोरदार तेजी आली. कृषिमालाचे भावदेखील चांगलेच वधारले आहेत.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

मात्र ही तेजी अल्पकालीन ठरली आणि बाजारात व्याजदर वाढ या घटकाची जागा अल्पकाळासाठी का होईना पण अमेरिकी कर्जमर्यादा वाढीला विरोध या घटकाने घेतली आहे. त्यामुळे आणि अमेरिकेतील माफक प्रमाणात येऊ घातलेल्या आर्थिक मंदीमुळे सावरणारे बाजार परत मंदीत आले आहेत. मागील अनेक वेळेचा अनुभव पाहता शेवटच्या क्षणी या कर्जमर्यादा वाढीला संमती मिळतेच. परंतु काही काळासाठी निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेमुळे बाजाराचा समतोल नक्कीच बिघडतो. या अशा वातावरणात जागतिक कमॉडिटी बाजाराचा प्रभाव असलेल्या कमॉडिटीजचा कल ओळखणे कठीण काम असते. त्यामुळे यावेळी केवळ भारतीय बाजारातील घटकांवर अवलंबून असलेल्या हळद या कमॉडिटीबाबत बाजार कल कसा राहील याचा आढावा घेतला आहे. तसे पाहता आशिया खंडात वर्षभर वापरल्या जाणाऱ्या हळदीची करोनाकाळात जगभर चर्चा झालेली आपण पहिली. त्या वर्षात हळदीची विक्रमी निर्यातदेखील झाली आहे. अशा या हळदीचा नवीन हंगाम काही दिवसांपूर्वी सुरू झाला. नेहमीप्रमाणे नवीन आवक बाजारात येऊ लागताच किमती पडू लागल्या. मात्र प्रतिक्विंटल ७,५०० रुपयांवरून ६,६०० रुपयांवर येण्यासाठी दोन महिने घेणारी हळद मागील पंधरवड्यात ६,६०० रुपायांवरून ७,५०० रुपयांवर केवळ ६ दिवसांत झेपावली. जून महिन्याचा वायदा तर ७,८०० रुपये ही पातळी पार करून गेला आणि बाजारात एक चैतन्य आले. नवीन हंगाम अजून संपला नसताना अचानक १३-१४ टक्क्यांची तेजी ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब असली तरी ही तेजी कितपत टिकाऊ असेल आणि अल्पकाळासाठी व दीर्घकाळासाठी बाजारकल कसा राहील याची व्यापारजगतामधून मिळालेली माहिती अशी आहे.

आणखी वाचा-गुंतवणुकीमागे ठरलेले ध्येय गाठायचे आहे, तर ‘इक्विटी’च सर्वोत्तम!

हळदीमध्ये सध्या आलेल्या तेजीचे महत्त्वाचे कारण आहे अवेळी आलेला पाऊस. हळद-बहुल मराठवाडा, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील कृष्णा, गुंटूर, वारंगळ इत्यादी जिल्ह्यांत मागील महिन्यांत अनेकदा मोठ्या प्रमाणावर गारपीट किंवा पाऊस यापैकी एक किंवा दोन्ही गोष्टी घडल्या. अनेक ठिकाणी काढून सुकवायला ठेवलेली हळद भिजून खराब झाली. यातून एकंदर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाजाचा परिपाक म्हणून अचानक तेजी आली. नेहमीचा अनुभव पाहता कालांतराने हे नुकसान अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे जाणवून बाजार पूर्ववत होतात.

मार्च महिन्यातील अंदाजाप्रमाणे यावर्षी हळदीचे उत्पादन १३.० ते १३.५ लाख टन होण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ते थोडेसेच कमी आहे. अलीकडे हळदीमध्ये आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रामध्ये लागवडीचे क्षेत्र घटल्यामुळे उत्पादनात घट वर्तवली जात होती. मागील महिन्यात निजामाबाद, सांगली व हिंगोली-वसमत या प्रमुख व्यापारी केंद्रांवर हळदीची सुरुवातीची आवक आठ लाख पोत्यांपर्यंत पोहोचली आणि हळदीचे भाव नेहमीप्रमाणे कोसळले. मात्र मागील महिन्याच्या मध्यापासून अनेक राज्यांत सुरू झालेल्या अवेळी पावसाने इतर पिकांप्रमाणे हळदीचेदेखील नुकसान केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि हळदीमध्ये अनपेक्षित तेजी आली. सध्या आवक सरासरीच्या जवळपास असून खरीप हंगामात पैसा उभा करण्यासाठी आवक वाढेल असा अंदाज आहे.

आणखी वाचा-पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना : कंपनीवरील कर्जभार दखलपात्रच !

परंतु एकंदरीत पुरवठ्याचे चित्र तेवढे चिंताजनक नाही. मागील वर्षातील शिल्लक साठा निदान ३० ते ३५ लाख पोती असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. तसेच या वर्षातील उत्पादनाचे सुधारित अनुमानदेखील १२.५ लाख टन एवढे राहील. तर देशांतर्गत मागणीत विशेष बदल झाला नसला तरी मसाला बोर्डाच्या आकड्यांनुसार, मागील वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या ११ महिन्यांत हळद निर्यात १० टक्क्यांनी वाढून १,५१,२९८ टन एवढी झाली आहे. तर फेब्रुवारीतील निर्यात १४,८०० टन राहिली, जी जानेवारी पेक्षा १९ टक्के अधिक होती. गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ४३ टक्के अधिक राहिली आहे. हाच कल मार्च-एप्रिलमध्ये राहील अशी अपेक्षा आहे.

मागणी पुरवठा एकंदर चित्र समतोल दिसत असून नजीकच्या काळात आवक परत वाढल्यास बाजारात परत एक “करेक्शन” येऊन हळद परत प्रतिक्विंटल ६,५०० रुपये ते ६,७०० रुपयांपर्यंत घसरणे शक्य आहे. या पातळीवर किमतीला चांगला आधार आहे. त्यामुळे सध्या स्टॉकिस्ट थांबून राहिले असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सध्याची तेजी ही संधी समजून उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी यांनी वायदे बाजारात हळदीचे जून करार (कॉन्ट्रॅक्ट) ७,८०० रुपये ते ८,१०० रुपये या कक्षेत किंवा ऑगस्ट करार ८,१५० रुपये ते ८,३५० रुपयांच्या कक्षेत आपले निदान ६०-७० टक्के उत्पादन विकून जोखीम व्यवस्थापन करून टाकावे. त्यानंतर आपले करार समाप्त होण्यापूर्वी बाजारात ६,७०० रुपये ते ६,८०० रुपयांचा भाव आल्यास आपला सौदा कापून नफा घ्यावा.

अर्थात पुढील दोन-तीन महिन्यांसाठी ही व्यूहरचना असली तरी दीर्घ कालावधीसाठी हळद यावर्षी १०,००० रुपयांची पातळी सहज ओलांडेल असे वाटत आहे. याचे कारण एकंदर मसाले वर्गातील कमॉडिटी तेजीमध्ये आहेत. आपण यापूर्वी दोन वेळा चर्चा केलेले जिरे आता ४८,००० रुपये प्रतिक्विंटल ही लक्ष पूर्ण करून ५०,००० रुपयांचे द्वितीय लक्ष गाठण्यासाठी तयार आहे. धणे देखील अलीकडेच ६,२०० रुपयांवरून ७,००० रुपयांवर गेले आहे. कारण बाजार नेहमीच ४ ते ६ महिने पुढील चित्र पाहत असतो. येते वर्ष ही एल-निनो म्हणजे कमी पाऊसमानाचे राहील असे भाकीत असल्यामुळे खासकरून भारतात पिकणाऱ्या शेतमालाचे भाव पुढील काळात चढेच राहतील. परंतु ही तेजी ऑगस्टनंतर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्यातरी हळदीतील तेजीमध्ये जोखीम व्यवस्थापनाची संधी शोधण्यात शेतकऱ्यांचे हित आहे.