scorecardresearch

सोने २०२३ मध्ये कितपत चमकेल?

या वर्षात निदान पहिल्या सहामाहीमध्ये तरी हाच कल चालू राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सोन्यासाठी हा काळ चांगला राहील असे जाणकार सांगत आहेत.

सोने २०२३ मध्ये कितपत चमकेल?
सोने २०२३ मध्ये कितपत चमकेल? ( संग्रहित छायाचित्र )

श्रीकांत कुवळेकर

सोने हे असे जिन्नस आहे जे विश्लेषक आणि जाणकार यांना नेहमीच चकित करीत असते. ऑगस्ट २०२० मधील उदाहरणावरून याची प्रचीती येते. त्या वेळी ६५ ते ७० हजारांचे लक्ष्य ठेवून, ५६,००० रुपयांवर सोनेखरेदी करणाऱ्यांच्या पदरी निराशाच आली…

नुकतेच २०२२ वर्ष सरले आहे. मागील संपूर्ण कॅलेंडर वर्षाकडे गुंतवणूकदारांच्या चष्म्यातून पाहिल्यास असे दिसून येईल की, कमोडिटी बाजारात शेअर बाजाराप्रमाणेच चढ-उताराचे राहिल्यामुळे वार्षिक परतावा फार मिळालेला नाही. परंतु कृषिमाल बाजारपेठेपुरता विचार केल्यास एखाद दुसऱ्या कमोडिटीने चांगलाच परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, जिरे या मसाला पिकाने सर्वात जास्त म्हणजे सुमारे ९६ टक्के… होय जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. तर एरंड बी आणि गवार या दोन कमोडिटीजनी अनुक्रमे १८ टक्के आणि १७ टक्के एवढा परतावा दिला आहे. तर अकृषी कमोडिटीजमध्ये निकेल (५७ टक्के), नैसर्गिक वायू (३५ टक्के) आणि खनिज तेल (१५ टक्के) यांच्यानंतर सोने (१४ टक्के) आणि चांदीचा (११ टक्के) अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. अर्थात वर्षाच्या पहिल्या आणि शेवटच्या व्यापारी दिवसाचे बंद भाव या तांत्रिक कसोटीवर काढलेले हे परतावे आहेत.

दरवर्षी जरी कृषी कमोडिटीजमध्ये सरासरीपेक्षा जास्त परतावे मिळत असले तरी सामान्य गुंतवणूकदारांना त्यामध्ये गुंतवणूक करण्यात अजूनही फारसा रस नाही. किंबहुना, त्यातील गुंतवणुकीचे बारकावे समजून घेण्याची सवय अंगी बाणवून घेण्यात ते कमी पडतात असेही म्हणता येईल. या पार्श्वभूमीवर कमोडिटीमधील गुंतवणूक अजूनही केवळ सोने आणि चांदी या दोनच वस्तूंमध्ये केली जाते. त्यामुळे २०२३ मध्ये या कमोडिटीजबाबत बाजाराचा कल काय राहील याचा ऊहापोह करणे इष्ट ठरेल.

तसे पाहता आजच्या वेगवान जगात संपूर्ण वर्षाचे बाजार कल देणे धाडसाचेच ठरते. कारण दर आठवड्याला घडणाऱ्या जागतिक घटनांचा बाजारावर सतत परिणाम होत असल्याने सकाळची परिस्थिती रात्री बदलत असते. त्या अनुषंगाने या स्तंभातून आपल्याला सोने आणि चांदी या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न चालूच असतो. थोडे मागे पाहिले तर लक्षात येईल की, ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,००० रुपयांवर गेले तेव्हा ६५,००० रुपये आणि ७०,००० रुपयांचे लक्ष्य ठेवून प्रत्येक जण सोनेखरेदी करण्यास सांगत होते. मात्र तेव्हा फक्त याच स्तंभातून सोने वायदे बाजारात ५२,०००-५०,००० पर्यंत येईल असे सूचित केले गेले होते. आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. तर मागील जुलैअखेर या स्तंभातून सोने दीर्घकालीन खरेदी करण्यास योग्य वेळ या सदराखाली सोने ४९,००० – ४८,२०० रुपये या पातळीवर तळ गाठेल असे सूचित करून टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू करण्यास सुचविले गेले होते. या वेळी देखील सोन्याने ४९,००० रुपयांवर तळ गाठून उसळी घेण्यास सुरुवात केली. जर रुपयाचे फार अवमूल्यन झाले नसते तर ४८,२०० रुपये ही पातळीदेखील गाठली असती. मात्र पुढील पाच महिन्यांत सोन्यामध्ये जोरदार तेजी येऊन मागील शुक्रवारपर्यंत सोन्याने ऑगस्ट २०२० मधील विक्रम मोडून ५६,२०० रुपयांवर जाऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच १३ टक्के परतावा देणाऱ्या सोन्यामध्ये २०२३ या वर्षात बाजार कल कसा राहील ही बघणे महत्वाचे ठरेल.

यापूर्वीच आपण म्हटल्याप्रमाणे सोन्याची मागणी आणि किंमत या भारतातील सणवार, लग्नसराई किंवा पितृपक्ष अशा गोष्टींवर अजिबात अवलंबून नसते. तर सोने ही अनेकदा कमोडिटीपेक्षा चलन म्हणून वापरली जात असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा कल अवलंबून असतो. त्या दृष्टीने पाहिल्यास जगावर आज मंदीचे सावट पसरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीमध्ये जोरदार घट झाल्याचे नौवहन क्षेत्रातील जाणकार सांगतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तसा इशाराच दिला आहे. महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचे सत्र सुरू असले आणि ते अजून दोन-तीन महिने चालू राहील. तरी दरवाढीचा अंत जवळ आला आहे, असे बिनदिक्कत म्हणता येत नाही. युक्रेन-रशिया युद्ध संपले नसले तरी त्यावर शांततेचा तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान, बांगलादेशसारख्या अनेक अशक्त अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहेत. तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने परस्परविरोधी घटकांचा एकत्रित विचार केला तर आपल्यासमोर अनिश्चितता हे एकच उत्तर येते. अशा वेळी सोनेखरेदी हा एकाच पर्याय प्रत्येक देशासमोर उभा राहतो. मागील तीन वर्षे तरी हीच परिस्थिती आहे. म्हणूनच जगातील मध्यवर्ती बँका सोनेखरेदी करीत आहेत. अलीकडील काळात सोन्यात आलेली तेजी ही त्याचेच द्योतक आहे हे याबाबतची आकडेवारी दर्शविते.

२०२० या कोविड वर्षात जगातील मध्यवर्ती बँकांनी २७३ टन सोने खरेदी केले होते. २०२१ मध्ये ही खरेदी चक्क ८२ टक्क्यांनी वाढून ४६३ टनांवर गेली. तर २०२२ वर्षातील आकडेवारी प्रसिद्ध झाली नसली तरी केवळ जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्येच ४०० टन असल्यामुळे वार्षिक आकडेवारी नवीन उच्चांक गाठेल हे नक्की. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनेच मागील तीन वर्षांत सुमारे १३४ टन सोने घेतले आहे.

या वर्षात निदान पहिल्या सहामाहीमध्ये तरी हाच कल चालू राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सोन्यासाठी हा काळ चांगला राहील असे जाणकार सांगत आहेत. रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतात सोने ऑगस्ट २०२० मधील ५६,३५० रुपयांचा उच्चांक गाठला असला तरी जागतिक बाजारपेठेमध्ये सोने अजूनही १९१५ डॉलर म्हणजे उच्चांकाच्या १६० डॉलर मागे आहे. मध्यवर्ती बँकांची खरेदी, टेक्निकल चार्ट आणि डॉलर निर्देशांकामधील अपेक्षित दोन-तीन टक्के नरमाई या दोन गोष्टींचा आधार मिळून जागतिक किंमत पहिल्या तिमाहीअखेर १९४२ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरल्यास भारतात सोने वायदेबाजारात ५७,२००-५७,५०० रुपयांची पातळी गाठू शकेल. म्हणजे जीएसटी धरून ५९,०००-५९,२०० च्या जवळपास सोने जाऊ शकेल. परंतु या प्रवासामध्ये अनेक खाचखळगे असतील.

एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की, बाजारामध्ये पुढील तीन ते सहा महिन्यांतील गोष्टी अगोदरच प्रतिबिंबित झालेल्या असतात. त्यामुळे सोन्यातील अलीकडील तेजीमध्ये वरील घटक बऱ्याच प्रमाणात अंतर्भूत आहेत. या शिवाय सोने हे असे जिन्नस आहे जे विश्लेषक आणि जाणकार यांना नेहमीच चकित करीत असते. ऑगस्ट २०२० मधील उदाहरणावरून याची प्रचीती येते. त्या वेळी ५६,००० रुपयांनी सोने खरेदी केलेले गुंतवणूकदार आता ५६,५००-५७,००० या कक्षेत विक्रीचे दडपण आणण्याची दाट शक्यता आहे. ते शोषून घेण्यास महिनाभर लागेल. त्यामुळे येणारा काळ हा गुंतवणूकदारांचा संयम पाहण्याचीदेखील शक्यता आहे.

शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा. खनिज तेल मागील दोन महिन्यांत घसरले असून, मंदी आल्यास अजून खाली घसरेल. तर नैसर्गिक वायू मागील तीन महिन्यांत ६३ टक्के घसरला आहे. या दोन गोष्टींमुळे युरोप आणि पाश्चिमात्य देशांच्या ऊर्जाखर्चात मोठी बचत होऊन तेथील अर्थव्यवस्था लवकर रुळावर येऊ शकतील. तसे झाल्यास सोन्याची आकर्षकता थोडीतरी कमी होईल.

एकंदर गोळाबेरीज असे दर्शवते की, सोन्यामध्ये पहिल्या सहामाहीमध्ये अजून हजार दीड हजार रुपयांची भाववाढ होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे मागील चार-पाच महिन्यांमध्ये खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांनी अजून थांबणे उचित ठरेल. परंतु नव्याने सोने खरेदी तेवढी किफायतशीर राहणार नाही.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

ksrikant10@gmail.com

(अस्वीकृती : कमाॅडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून, वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.)

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 12:07 IST

संबंधित बातम्या