मुंबई: आयआयटी, मुंबईच्या प्रयोगशाळांमधून विकसित झालेल्या नाविन्याचे उमद्या व्यावसायिक उपक्रमात रूपांतरणाचा अद्वितीय नमुना ठरलेल्या, सेडेमॅक मेकट्रॉनिक्स ही वाहन उद्योगासाठी पूरक इलेक्ट्रॉनिक घटकांची निर्माता कंपनी आता भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना आजमावत आहे. येत्या ४ मार्चपासून प्रस्तावित कंपनीच्या प्रारंभिक भागविक्रीतून १,०८७ कोटी रुपये उभारले जातील.

वाहन उद्योगातील यांत्रिकी ही पाश्चिमात्य जगात झालेल्या संशोधनाची प्रतिकृती म्हणून आजवर वापरात आली आहे. गुुंतागुतीच्या तंत्रज्ञानात्मक घटकांच्या विकसनाचा कस भारतात पहिल्यांदाच लागला आणि अशा यांत्रिकी अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स यांचा मिलाफ म्हणजे सेडेमॅक असल्याचे कंपनीचे सह-संस्थापक प्रा. शशिकांत सुर्यनारायणन म्हणाले. आयआयटी मुंबईत सहाय्यक अध्यापक असलेल्या सुर्यनारायणन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील विद्यार्थी अमित दीक्षित, मनिष शर्मा, अनय कुमार जोशी यांच्या सोबतीने ही ६,००० कोटी रुपयांचे मूल्यांकन असलेली कंपनी उभी केली आहे.

सेडेमॅक भारतातील जेनसेट कंट्रोलर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्सच्या (ईसीयू) आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. कंपनी दुचाकी, तीन चाकी, इलेक्ट्रिक वाहने, ई-बाईक आणि औद्योगिक जेनसेटमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे घटकांची निर्मिती करते. कंपनीद्वारे निर्मित दुचाकींसाठी ईसीयू हे भारतातील प्रमुख ओईएम तसेच अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठांना पुरवले जातात. टीव्हीएस मोटर कंपनी, बजाज ऑटो, किर्लोस्कर ऑइल इंजिन, ब्रिग्ज आणि स्ट्रॅटन एलएलसी हे कंपनीच्या उत्पादनांचे प्रमुख ग्राहक आहेत. जेनसेट कंट्रोलर्समध्ये कंपनीकडे भारतातील ७७ टक्के बाजारहिस्सा, तर ईसीयूमध्ये तिचा ३५ टक्के बाजारहिस्सा आहे.

प्रस्तावित आयपीओसाठी सेडेमॅकने प्रति समभाग १,२८७ रुपये ते १,३५२ रुपये असा किंमत पट्टा निर्धारीत केला आहे. समभागांची विक्री ४ मार्च ते ६ मार्च या दरम्यान सुरू राहिल. विद्यमान मूळ गुंतवणूकदारांकडून त्यांच्याकडील हिस्सेदारीच्या आंशिक विक्रीचा (ओएफएस) हा संपूर्ण आयपीओ असून, त्यातून उभ्या राहणारा निधी कंपनीसाठी वापरात येणार नाही. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ११ समभागांसाठी बोली लावून आयपीओत सहभागी होता येईल. सेडेमॅकने मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६५८ कोटी रुपयांच्या महसूलावर ४७ कोटींचा नफा कमावला आहे, तर २०२५-२६ च्या नऊमाहीत कंपनीचा महसूल ७७० कोटी रुपये तर नफ्याचे प्रमाण ७१.४ कोटी रुपयांवर गेले आहे.

आयआयटी मुंबईला ३९.७५ कोटींचा लाभ

उद्योगांशी भागीदारीत नवउद्यमी संवर्धन संस्था असलेली ‘साइन’ (सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रीन्योरशिप) या आयपीओमध्ये तिचे २,९४,११७ (२.९४ लाख) समभाग विकत आहे. २००७ साली सेडेमॅकच्या स्थापनेसमयी ‘साइन’कडे ७ टक्के हिस्सेदारी आली होती, ती टप्प्याटप्प्याने कमी होत आयपीओपूर्व १.३५ टक्क्यांवर होती. ही हिस्सेदारी आयपीओतून आणखी कमी होणार असली तरी, प्रत्येकी १,३५२ रुपयांच्या किमतीने होणाऱ्या विक्रीतून संस्थेला ३९.७५ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.