India US Trade Deal Impact On Stock Market: भारत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेनंतर, प्रमुख भारतीय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी मोठी वाढ पाहायला मिळाले. या करारानंतर बाजारात मोठी खरेदी झाली असून, आज सेन्सेक्स २,०७२.६७ अंशांनी किंवा २.५४ टक्क्यांनी वाढून ८३,७३९ वर बंद झाला. तर निफ्टी ६३९.१५ अंशांनी किंवा २.५५ टक्क्यांनी वाढून २५, ७२७.५५ वर बंद झाला.

बाजाराच्या सुरुवातीला बाजाराची स्थिती निर्णायकपणे सकारात्मक होती. वाढलेल्या शेअर्सची संख्या घसरलेल्या शेअर्सच्या तुलनेत खूप जास्त होती, जे सुरुवातीच्या व्यवहारात सर्वसमावेशक खरेदीचा उत्साह दर्शवते.

भारत अमेरिका व्यापार करार

अमेरिका भारतावरील आयातशुल्कामध्ये कपात करत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री केली. आता हे शुल्क २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के असेल आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने लागू होईल, असेही ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

ट्रम्प यांनी दावा केला आहे की, आयातशुल्क कपातीच्या बदल्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे मान्य केले आहे. तसेच, भारत अमेरिकेकडून विविध क्षेत्रांमध्ये ५०० अब्ज डॉलरची खरेदी करणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले. याबरोबरच भारत अमेरिकेवरील आयातशुल्क कमी करत करत शून्यापर्यंत आणेल असेही त्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट

ट्रम्प यांनी लिहिले आहे की, “आम्ही व्यापार आणि युक्रेन-रशिया युद्धसमाप्तीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करण्याचे आणि अमेरिकेकडून, तसेच व्हेनेझुएलाकडून जास्त तेल खरेदी करण्याचे मान्य केले आहे. यामुळे युक्रेनमधील युद्ध थांबवणे शक्य होईल.” पंतप्रधान मोदींबद्दल आपल्याला आदर वाटतो, त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून भारताबरोबर व्यापार करार करण्याचे मान्य केले असल्याचेही ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले आहे.

आमचे भारताबरोबरच मजबूत संबंध अधिकाधिक दृढ होतील. मी आणि मोदी एकत्र येतो तेव्हा आम्ही कृती करतोच. इतर बऱ्याच लोकांबाबत असे म्हणता येत नाही.

डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

५०० अब्ज डॉलरच्या खरेदीचा दावा

ट्रम्प यांनी भारत अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात खरेदी करणार असल्याचा दावा केला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी आणखी मोठ्या प्रमाणात अमेरिकी वस्तू खरेदी करण्याचेही मान्य केले आहे. भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर क्षेत्रांमध्ये ५०० अब्ज डॉलरपर्यंत खरेदी करेल,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.