Indian Share Market Crashed News : आखाती देशांमधील वाढता तणाव, जागतिक भांडवली बाजारातील कमकुवत कल, तेलाच्या वाढलेल्या किंमती व अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे भारतातील आघाडीचा निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टी गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीदेखील (१३ जून) आपटला आहे. सेन्सेक्स व निफ्टी गुरुवारी एक टक्क्याने गडगडले होते. तर, शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत सेन्सेक्स १.०५ टक्क्यांनी (८७० अंकांनी) घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. तर निफ्टीची २६०.६५ अंकांनी म्हणजेच १.०५ टक्क्याने घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजार कालही ८०० हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यामुळे दोन दिवसांत मिळून शेअर बाजाराची तब्बल १६०० हून अधिक अकांनी घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजाराची इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून मध्य-पूर्वेतील राष्ट्रांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच गुरुवारी इस्रायलने इराणवर हल्ला केल्यामुळे तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. तेलाच्या किंमती गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्याचा थेट भारतासह अनेक देशांमधील शेअर बाजारांवर परिणाम झाला आहे. तेलाच्या किंमती वधारल्यामुळे भारतीय शेअर बाजार गडगडला आहे.

बीएसई व निफ्टीची सलग दोन दिवस घसरण

गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८२३.१६ अंकांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून ८१,६९१.९८ अंकांवर स्थिरावला होता. तर शुक्रवारी सकाळी बाजारात व्यवहार सुरू होताच त्यामध्ये आणखी ८७० अंकांची घसरण झाली असून सकाळी १० वाजता बीएसई ८०,८२१.५४ अंकांवर व्यवहार करत आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गुरुवारी २५३.२० अंकांची (१.०१ टक्के) घसरण झाली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निफ्टी २५,००० अंशांच्या पातळीखाली २४,८८८.२० अंकांवर जाऊन बंद झाला होता. आज त्यात आणखी घसरण झाली असून सकाळी १० वाजता निफ्टी २४.६१७ अंकांवर व्यवहार करत आहे.

प्रमुख कंपन्यांचे शेअर्स घसरले

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री चालू ठेवल्यामुळे भारतीय भांडवली बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा मोटर्स, टायटन, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा टाटा समूहातील सर्वच कंपन्यांना फटका बसला आहे. टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची चिंता वाढली

दरम्यान, आनंद राठी ग्लोबल फायनान्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन व्यास यांनी या स्थितीचं विश्लेषण केलं आहे. ते म्हणाले,”भारत ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. मात्र, इराण व इस्रायलमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून त्या अजून वाढू शकतात. जगातील एकूण तेलसाठ्यांपैकी ९ टक्के तेलाचा साठा इराणकडे आहे. इराणमधील तणावाचा भारतातील तेल विपणन कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. जसे की बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसी या कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. तसेच पेंट्स (एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स), ऑटोमोबाइल व सिमेंट उद्योगांसह प्रमुख भारतीय क्षेत्रांचं नुकसान होऊ शकतं. मध्य-पूर्वेतील तणाव वाढला किंवा तीन-सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तणावाची स्थिती कायम राहिली, कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ८२-८५ डॉलर्सपेक्षा वर गेल्या तर वरील क्षेत्रांमधील मागणी मंदावू शकते किंवा आर्थिक फटका (नफ्यात घट) बसू शकतो”.