RBI Repo Rate Impact On Stock Market: जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे, प्रमुख इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरूच आहे.

सकाळी ११:०० च्या सुमारास सेन्सेक्स ३६३.९७ अंशांनी किंवा ०.४४ टक्क्यांनी घसरून ८२,९४९.९६ वर आला, तर निफ्टी १३१.४० अंशांनी किंवा ०.५१ टक्क्यांनी घसरून २५,५११.४० वर पोहोचला आहे.

आज सर्वच प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली, ज्यात आयटी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घट झाली. निफ्टी स्मॉल-कॅप १०० आणि निफ्टी मिड-कॅप १०० अनुक्रमे १.२८ टक्के आणि ०.७८ टक्क्यांनी घसरले.

१) आरबीआयचा रेपो दराबाबतचा निर्णय:

डिसेंबरमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची व्याजदर कपात केल्यानंतर, भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतरची ही पहिली पतधोरण आढावा बैठक होती.

चालू आर्थिक वर्षासाठी सहावे आणि अंतिम द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, पतधोरण समितीने तटस्थ भूमिकेसह अल्प-मुदतीचा कर्जदर किंवा रेपो दर ५.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवून, आरबीआयने सावधगिरीचा संकेत दिला आहे, ज्यामुळे इक्विटी आणि इतर जोखमीच्या मालमत्तांमध्ये सहज तरलता येण्याच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.

“महागाईचे संमिश्र संकेत, जागतिक अनिश्चितता आणि चलनातील अस्थिरता या पार्श्वभूमीवर, अमेरिकेसोबत आणि युरोपियन युनियनसोबतच्या अलीकडील व्यापार करारांमुळे निर्यातीच्या शक्यता वाढल्या असल्या तरी, हा निर्णय आरबीआयच्या सावध दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे”, असे बिलियनझ या वेल्थ प्लॅटफॉर्मचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी अभिषेक गोएंका यांनी रॉयटर्सला सांगितले.

२) एफआयआयची विक्री:

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी २,१५०.५१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. फेब्रुवारीमध्ये सलग दोन दिवस खरेदी केल्यानंतर एफआयआय काल पुन्हा निव्वळ विक्रेते होते.

:एफआयआय पुन्हा भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत आणि डेरिव्हेटिव्ह बाजारात त्यांची शॉर्ट पोझिशन्स वाढवत आहेत, हे नजीकच्या काळात बाजारात आणखी कमकुवतपणा येण्याचे संकेत देते”, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

३) जागतिक बाजारातील कमकुवत संकेत:

आशियाई बाजारपेठांमध्ये घसरण दिसून आली, ज्यात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक तोट्यात होते. गुरुवारी अमेरिकन बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली, ज्यात नॅसडॅक कंपोझिट १.५९ टक्क्यांनी, एस अँड पी ५०० १.२३ टक्क्यांनी आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १.२ टक्क्यांनी घसरला होता.