मुंबई: अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या जॅक्सन होल बैठकीतील बहुप्रतीक्षित भाषणापूर्वी जागतिक भांडवली बाजारांमध्ये संमिश्र कल शुक्रवारी निदर्शनास आला. त्याचे प्रतिबिंब म्हणून अस्थिरतेच्या छायेतही देशांतर्गत बाजारात, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल सारख्या ‘ब्लू-चिप’ समभागांतील खरेदीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.

भांडवली बाजार निर्देशांक शुक्रवारी सलग सातव्या सत्रात वाढले. चालू वर्षातील निर्देशांकांची ही सर्वात मोठी तेजीची मालिका आहे. अमेरिकेत व्याजदर कपातीच्या वाढत्या आशावादामुळे या तेजीत देशांतर्गत बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला, त्या परिणामी गेल्या सात सत्रांमध्ये निर्देशांकांनी सुमारे ३ टक्के वाढ साधली आहे.

हेही वाचा >>>चार वर्षांच्या खंडानंतर फ्रँकलिन टेम्पलटनच्या दोन ‘डेट’ योजना

सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३.०२ अंशांनी वधारून ८१,०८६.२१ पातळीवर बंद झाला. मात्र सलग दुसऱ्या सत्रात तो ८१,००० अंशांच्या पातळीवर टिकून राहण्यास यशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११.६५ अंशाची किरकोळ वाढ झाली. निफ्टी २४,८२३.१५ पातळीवर बंद झाला.

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी जगभरातील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे. गुंतवणूदार सप्टेंबर महिन्यातील अमेरिकेत संभाव्य व्याजदर कपातीच्या प्रतीक्षेत आहेत, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, सन फार्मास्युटिकल, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर टेक महिंद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, टायटन, इन्फोसिस, स्टेट बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी १,३७१.७९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,९७१.८० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ८१,०८६.२१ ३३.०२ (०.०४%)

निफ्टी २४,८२३.१५ ११.६५ (०.०५%)

डॉलर ८३.८९ -४

तेल ७८ १.०१