Infosys Anthropic Strategic Partnership Announcement 2026: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. आज (१७ फेब्रुवारी) इन्फोसिसने एंटरप्रायझेससाठी प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सोल्यूशन्स तयार करण्यासाठी एआय फर्म अँथ्रोपिकसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स जवळजवळ ३% वाढून १,४०७ रुपयांवर पोहोचले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अँथ्रोपिक एआयने काही प्लगइन्स लॉन्च केले होते. ज्यामुळे जगभरातील आयटी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. कोसळलेल्या शेअर्समध्ये भारतातील इन्फोसिस आणि टीसीएससारख्या कंपन्यांचाही समावेश होता.
अत्यंत नियंत्रित क्षेत्रातील कंपन्यांना एआयचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास आणि आवश्यक सेवा प्रदान करण्यात कार्यक्षमता सुधारण्यास मदत करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. अँथ्रोपिकने बेंगळुरूमध्ये काल त्यांचे भारतातील पहिले कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर आज लगेचच या भागीदारीची घोषणा केली.
“डेमोमध्ये काम करणाऱ्या एआय मॉडेल आणि नियंत्रित उद्योगात काम करणाऱ्या मॉडेलमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि जर तुम्हाला ती तफावत भरून काढायची असेल, तर तुम्हाला डोमेन कौशल्याची आवश्यकता आहे,” असे अँथ्रोपिकचे सीईओ आणि सह-संस्थापक डारियो अमोदेई म्हणाले.
“इन्फोसिसकडे दूरसंचार, वित्तीय सेवा आणि उत्पादन यांसारख्या महत्त्वाच्या उद्योगांमध्ये नेमके असेच कौशल्य आहे. त्यांचे डेव्हलपर्स कामाचा वेग, अचूकता, अनुपालन आणि सखोल डोमेन ज्ञानाची आवश्यकता असलेल्या उद्योगांसाठी एआय एजंट्स तयार करण्यासाठी आधीपासूनच क्लॉड कोड वापरत आहेत”, असे त्यांनी पुढे सांगितले.
या दोन्ही कंपन्या मिळून प्रगत एंटरप्राइझ एआय टूल्स विकसित करत आहेत. त्या अँथ्रॉपिकच्या क्लॉड एआय मॉडेल्सचा (क्लॉड कोडसह) इन्फोसिसच्या टोपाझ एआय प्लॅटफॉर्मशी एकत्रित वापर करणार आहेत. यामागील उद्देश गुंतागुंतीची कामे स्वयंचलितपणे आणि स्वतंत्रपणे पूर्ण करू शकणारे एआय एजंट्स तयार करणे आहे.
“एआयमुळे केवळ व्यवसायात बदल घडत नाहीत, तर ते उद्योगांच्या कार्यपद्धती आणि नवोपक्रमाची नव्याने आखणी करत आहे”, असे इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले.
“अँथ्रोपिकसोबतचे आमचे सहकार्य एंटरप्राइझ एआयला पुढे नेण्याच्या दिशेने एक धोरणात्मक झेप आहे, ज्यामुळे संस्था अधिक बुद्धिमान, लवचिक आणि जबाबदार बनण्यास सक्षम होतील”, असे त्यांनी पुढे म्हटले.
कोणत्या उद्योगांना याचा फायदा होईल?
दूरसंचार क्षेत्रात एका विशेष अँथ्रोपिक सेंटर ऑफ एक्सलन्ससह हे सहकार्य सुरू होईल आणि ते इतर क्षेत्रांमध्ये हळूहळू वाढवले जाईल. शिवाय, या भागीदारीचा फायदा अनेक क्षेत्रांना होऊ शकतो. यामध्ये दूरसंचार, वित्तीय सेवा, उत्पादन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे.

