लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : तरुणांसाठी फॅशन परिधानांमध्ये अग्रणी असलेल्या फोर्कास स्टुडिओ लिमिटेडने येत्या १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेशाची योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून कंपनीने ३७.४४ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर कंपनीचे समभाग सूचिबद्ध केले जाणार आहेत. एफटीएक्स, ट्राइब आणि कॉन्टेनो या नाममुद्रेने फोर्कास स्टुडिओची पुरुषांसाठी शर्ट, डेनिम, टी-शर्ट, ट्राऊजर्स आणि स्पोर्ट्सवेअरची श्रेणी बाजारात प्रचलित आहे. २०२१ मध्ये कंपनीने ऑनलाइन व्यवसायाकडे वळण घेतले आणि देशभरात १५ हजारांपेक्षा पिन कोड क्रमांक ठिकाणांवर ग्राहकांना थेट घरपोच सेवा कंपनीकडून दिली जाते.‘आयपीओ’मधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग गोदामाच्या अद्ययावतीकरणासाठी, कंपनीने घेतलेल्या कर्जाची आंशिक परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी कंपनीकडून केला जाईल. हेही वाचा >>>वस्तू निर्यातीत जुलैमध्ये १.२ टक्क्यांची घट; व्यापार तुटीत २३.५ अब्ज डॉलरपर्यंत विस्तार होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या आयपीओ प्रक्रियेचे व्यवस्थापन पाहात आहे. कंपनीने प्रति समभाग ७७ रुपये ते ८० रुपये हा किंमतपट्टा निर्धारित केला आहे आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १,६०० समभागांसाठी बोली लावावी लागेल. आगामी धोरणात्मक विस्ताराची महत्त्वाकांक्षा स्पष्ट करताना, फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश अग्रवाल यांनी शैली, गुणवत्ता आणि परवडणारी किंमत या वैशिष्ट्यांसह भारतीय मेन्सवेअर बाजारातील प्रतिष्ठित ब्रॅण्ड म्हणून नाव स्थापित करण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. कंपनीची ९५ टक्के उत्पादने ही ४९९ रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. येत्या काळात लेडीज वेअर आणि किड्स वेअर या नवीन व्यवसाय श्रेणीत प्रवेशाचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.