Sensex Crashing 4 March 2026: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाचा जगभरातील शेअर बाजारांना मोठा फटका बसू लागला आहे. यामध्ये भारतीय शेअर बाजाराचाही समावेश आहे.

या लष्करी संघर्षामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी आज मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे निफ्टी ५० निर्देशांकही नकारात्मक व्यवहार करत आहे.

आज शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी बाजार भांडवलातील सुमारे ९ लाख कोटी रुपये गमावले, बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मूल्यांकन मागील सत्रातील ४५७ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४४८ लाख कोटी रुपयांवर घसरले.

सकाळी १:३० वाजता सेन्सेक्स १,२४५.४५ अंशांच्या घसरणीसह ७८,९९३.४० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ४१०.४४ अंशांच्या घसरणीसह २४,४५५.२५ वर व्यवहार करत होता.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे ​​मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले, “युद्ध लांबत असल्याने आणि क्रूड तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने, बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.”

या युद्धाच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत ते म्हणाले, “हा संघर्ष किती काळ चालेल आणि तो किती मोठा विनाश घडवून आणेल, हे कोणालाच माहीत नाही. भारत आपल्या तेलाच्या गरजेसाठी ८५% आयातीवर अवलंबून आहे. यामुळे खरी चिंता संभाव्य महागाई आणि त्याचे आर्थिक विकासावर होणारे परिणाम हीच आहे.”

“बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, व्यापार तूट वाढण्याची शक्यता, रुपयाचे घसरणारे मूल्य, वाढलेली महागाई आणि कदाचित मंदावणारी आर्थिक वाढ हे खरे प्रश्न आहेत. जर ही भीती प्रत्यक्षात उतरली, तर कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. सध्या बाजारपेठेत हीच भीती आहे. ही भीती तेव्हाच खरी ठरेल जर हे युद्ध दीर्घकाळ लांबले. जर हे युद्ध समजा, ३ ते ४ आठवड्यांत संपले, तर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल”, असेही त्यांनी नमूद केले.

आशियाई बाजारही नकारात्मक

आज देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण जागतिक प्रवाहांशी सुसंगत असल्याचे दिसत आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेमुळे मंगळवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले. सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

इराणमधील संघर्षामुळे जागतिक स्तरावर पुन्हा महागाई वाढण्याची भीती निर्माण झाल्याने आणि तेलाच्या किमती हळूहळू वाढू लागल्याने, आशियाई बाजारांनी सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदवली. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून लवकरच होणाऱ्या व्याजदर कपातीची अपेक्षा सोडून दिली आहे.