Samsung and SK Hynix market cap decline 170 billion dollars: मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची आणि वाढत्या ऊर्जा खर्चाची चिंता निर्माण झाली असल्याने, आज दक्षिण कोरियाचे शेअर बाजार घसरल्याचे पाहायला मिळाले. जोखीम टाळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटीजमधून ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे.
आज सुट्टीनंतर बाजार पुन्हा उघडल्यानंतर दक्षिण कोरियाचा प्रमुख निर्देशांक कोस्पी ७.२% घसरला. ही दक्षिण कोरियाच्या बाजारातील ऑगस्ट २०२४ नंतरची सर्वात मोठी घसरण होती. तर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि एसके हायनिक्स इंक. प्रत्येकी किमान ९.९% घसरले.
दीर्घकाळ चालणारे युद्ध हे कोरियन शेअर्समधील जागतिक स्तरावरील विक्रमी तेजीची मोठी परीक्षा ठरू शकते. कारण कोस्पी निर्देशांक यावर्षी अजूनही ३७ टक्क्यांनी वर आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) लाटेमुळे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सची मागणी वाढली आहे आणि त्या जोरावर सॅमसंग आणि एसके हायनिक्सने या तेजीला बळ दिले होते. मात्र, मंगळवारच्या घसरणीमुळे या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलातून सुमारे १७० अब्ज डॉलर्स (सुमारे १४ लाख ११ हजार कोटी रुपये) कमी झाले. यामुळे ही तेजी आणखी पुढे जाईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
“अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहण्याचा धोका आहे. यामुळे महागाई वाढण्याचा धोका अधिक बळकट होत असून अमेरिकन फेडरल रिझर्व्हसाठी व्याजदर कपात करण्याचा मार्ग कठीण होत आहे”, असे फिबोनाची ॲसेट मॅनेजमेंट ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंग इन युन यांनी सांगितले.
“ही परिस्थिती एआय संबंधित शेअर्सवर दबाव टाकत आहे, कारण या कंपन्यांचे वाढलेले व्हॅल्युएशन आता व्याजदर आणि तरलतेच्या अपेक्षांमधील बदलांनुसार अत्यंत संवेदनशील बनले आहेत”, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
दक्षिण कोरियाच्या बाजारात मंगळवारी एअरलाइन्स आणि ऑटोमेकर शेअर्समध्येही घसरण झाली. तेल कंपन्यांनी चांगली कामगिरी केली, तर संरक्षण कंत्राटदार हानव्हा एरोस्पेस कंपनी आणि एलआयजी नेक्स१ कंपनीचे शेअर्स १९% पेक्षा जास्त वधारले.
