मुंबई: इराण-इस्रायल दरम्यान वाढलेला तणाव आणि त्यापरिणामी खनिज तेलाचे दर भडकल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरणाचे नकारात्मक प्रतिबिंब देशांतर्गत बाजारातही शुक्रवारी उमटले. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले. सलग दुसऱ्या सत्रातील मोठ्या घसरणीने, दोन दिवसांत गुंतवणूकदारांची ८.३५ लाख कोटींची मत्ता लयाला गेली आहे.
सप्ताहअखेरच्या व्यवहारात सेन्सेक्स ५७३.३८ अंश गमावून ८१,११८.६० पातळीवर स्थिरावला. एकेसमयी त्याने १,३३७.३९ अंशांची घसरण दाखवत, ८०,३५४.५९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६९.६० अंशांची घसरण झाली आणि तो दिवसअखेर २४,७१८.६० पातळीवर बंद झाला. इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणि परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री करून बाहेरचा रस्ता धरल्याने निर्देशांकात मोठी घसरण झाली.
कमकुवत जागतिक संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाहेर पडण्याच्या दबावामुळे बाजारावर घसरणीचा ताण होता. इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक भांडवली बाजारातील गुंतवणूकदार चिंताक्रांत आहेत. जोखीम टाळण्यासाठी नफावसुलीला यातून अनेकांनी प्राधान्य दिले.
मे महिन्यातील देशातील किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यानुरूप घटला. मात्र बाह्य प्रतिकूल परिस्थितीमुळे हा सुपरिणाम झाकोळला गेला. खनिज तेलाच्या किमती अवघ्या काही दिवसांत पिंपामागे १० डॉलरने वधारून, ७६ डॉलरजवळ पोहोचल्या आहेत. चालू वर्षातील किमतीचा हा सर्वोच्च स्तर आहे. युद्ध तणाव कायम राहिल्यास महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, अदानी पोर्ट्स, आयटीसी, स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, टायटन, कोटक महिंद्र बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सन फार्मा आणि मारुती यांचे समभाग वधारून बंद झाले.
गुंतवणूकदार ८.३५ लाख कोटींनी गरीब
बाजार घसरणीच्या दोन सत्रात शेअर बाजारातील गुंतवणूकदार ८.३५ लाख कोटी रुपयांनी गरीब झाले आहेत. आखाती देशांमधील तणाव वाढल्याने दोन सत्रात सेन्सेक्स जवळपास २ टक्के गडगडला आहे. शिवाय खनिज तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८.३५ लाख कोटी रुपयांनी घसरून ४४७.२१ लाख कोटी रुपयांपर्यत (५.१९ ट्रिलियन डॉलर) ओसरले आहे.
सेन्सेक्स ८१,११८.६० -५७३.३८ -०.७०%
निफ्टी २४,७१८.६० -१६९.६० -०.६७%
तेल ७४.५२ ७.४४%
डॉलर ८६.०७ ५५ पैसे