Karachi Stock Exchange crash due to Pakistan Afghanistan conflict: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहे. या संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी “उघड युद्ध” सुरू झाले असल्याची टिप्पणी केल्यानंतर पाकिस्तान शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक केएसई-१०० व्यवहारांदरम्यान जवळपास २ टक्क्यांनी कोसळला होता.

केएसई-१०० निर्देशांक ३,०८१ अंशांनी किंवा १.८२ टक्क्यांनी घसरून दिवसाच्या नीचांकी १६५,८११.८८ वर पोहोचला होता. नंतर तो काही प्रमाणात सावरला आणि ५१८ अंशांच्या घसरणीसह १,६८,३७५ वर बंद झाला.

यामध्ये आज ऑटोमोबाईल असेंबलर्स, सिमेंट, व्यावसायिक बँका, खते आणि तेल व वायू उत्खनन शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग दिसून आली.

एक्सवरील एका पोस्टमध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, नाटो सैन्याच्या माघारीनंतर पाकिस्तानला अफगाणिस्तानात शांतता येईल अशी आशा होती आणि तालिबानने अफगाण लोकांच्या कल्याणावर व प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा होती.

“आमचा संयम आता संपला आहे. आता आमच्यात उघड युद्ध सुरू आहे”, असे ते म्हणाले होते.

पाकिस्तानी अधिकारी आणि अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने काबूल, दक्षिणेकडील कंधार आणि आग्नेयेकडील पक्तिया प्रांतात हवाई हल्ले केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ही टिप्पणी केली होती. पाकिस्तानने म्हटले आहे की, हे हल्ले अफगाणिस्तानने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून करण्यात आले आहेत.

दोन्ही सरकारांनी मृतांची संख्या वेगवेगळी असल्याचे आणि एकमेकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले, ज्यात काहींचे मृतदेह अफगाणिस्तानात नेण्यात आले होते आणि अनेकांना जिवंत पकडण्यात आले होते.

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की त्यांनी १९ पाकिस्तानी लष्करी चौक्या आणि दोन तळ उद्ध्वस्त केले आहेत. तसेच गुरुवारी रात्री सुरू झालेला हा लष्करी संघर्ष सुमारे चार तासांनी मध्यरात्रीच्या सुमारास संपला.