scorecardresearch

बाजारातील माणसं : के व्ही कामथ…संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग

कामथ यांचे एक अत्यंत लोकप्रिय वाक्य आहे – “अर्थव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी कालची पुस्तके वाचून उद्याच्या प्रश्नांना आज उत्तर शोधता येत नाही, म्हणून स्वतंत्र विचार आवश्यक आहे.”

KV Kamath, Bank, banking sector, financial crisis, ICICI
बाजारातील माणसं : के व्ही कामथ…संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ( संग्रहित छायाचित्र )

प्रमोद पुराणिक

कुंदापूर वामन कामथ यांचा जन्म २ डिसेंबर १९४७ ला कर्नाटक मंगळूरु येथे झाला. वडिलोपार्जित व्यवसाय मंगळूरुत होता आणि फलत-फुलतही होता. परंतु कामथ यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकायच्या असे जणू नियतीनेच ठरविले होते. आजपर्यंत तरी या वेगवेगळ्या आव्हानांना ते सामोरे गेले, त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली आणि यशही संपादले. सरकारनेसुद्धा या व्यक्तीवर अवघड जबाबदाऱ्या वारंवार सोपविल्या आणि हा क्रम आजही सुरूच आहे.

अलीकडेच त्यांना पुन्हा एका समितीवर काम करण्यास सांगितले गेले आहे. त्यांची ख्याती आणि त्यांच्याबद्दलची खात्रीच अशी आहे की, समितीवर ते असले की काम चांगले होणारच. बऱ्याच मोठ्या आर्थिक प्रकरणामध्ये खासदारांची संयुक्त समिती नेमली जाते. वर्षानुवर्षे ही समिती काम करते. अशात समितीने अहवाल सादर करण्यात बरीच वर्षे निघून जातात आणि तोपर्यंत विषयाचे गांभीर्य संपलेले असते, तरीसुद्धा असे प्रकार घडत असतात.

धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी मृत्युपत्र केलेले नव्हते, ते का केलेले नव्हते याची अनेक कारणे असू शकतील. परंतु आपली दोन्ही मुले एकत्र राहावीत अशी इच्छा मृत्युपत्र न करण्याचे एक कारण असू शकेल. परंतु पुढे मुकेश आणि अनिल ही भावंडे वेगवेगळी झाली. कंपन्यांची वाटणी कशी करायची याचा सल्ला घेण्यासाठी कोकिलाबेन अंबानी यांनी कामथ यांची मदत घेतली आणि त्यामुळे व्यवसायाची विभागणी व्यवस्थित झाली. खरे तर, बाजारावरील मोठे संकट टळले.

कामथ यांचे एक अत्यंत लोकप्रिय वाक्य आहे – “अर्थव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी कालची पुस्तके वाचून उद्याच्या प्रश्नांना आज उत्तर शोधता येत नाही, म्हणून स्वतंत्र विचार आवश्यक आहे.”

वर्षानुवर्षे बाजाराशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे कामथ यांनी निवडक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उपलब्ध आहे. परंतु वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना हे कधीही अडचणीचे ठरले नाही. अलीकडेच रिलायन्स जिओ या कंपनीच्या संचालक मंडळावरसुद्धा स्वतंत्र संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या रिलायन्सच्या बँकेतर वित्तीय अंग आणि नवव्यवसायाची जडणघडण त्यांच्याच देखरेखीत सुरू आहे.)

आयसीआयसीआय या बँकेचे अध्यक्ष असताना, त्या बँकेला एका कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. प्रसंग आणि समस्या तशी किरकोळच होती. गुजरातमधील एका छोट्या गावातील एटीएममधील पैसे संपले होते. एटीएममधील पैसे संपणे म्हणजे बँक संकटात सापडली असे अजिबात नसते. परंतु त्या काळी तशी अफवा पसरवली गेल्यामुळे, अनेक एटीएमसमोर सुट्टीच्या दिवशी पैसे काढून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. कामथ यांच्या नेतृत्वाचा कस लागावा इतके हे प्रकरण तापत गेले. चार-पाच दिवस हा माणूस रात्रंदिवस जागा होता. रिझर्व्ह बँकेची मदत घेऊन मोठ्या प्रमाणात नोटा गोळा करून ज्या ज्या गावात एटीएममध्ये नोटा भरण्याची गरज होती, त्या त्या ठिकाणी नोटा भरल्या गेल्या आणि बॅंकेवरचे संकट टळले.

भारतात वर्षानुवर्षे तीन संस्था डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स (डीएफआय) म्हणून गणल्या जात होत्या, त्यात आयडीबीआय, आयएफएसआयसीआय आणि आयसीआयसीआय यांचा समावेश होता. कामथ यांनी आक्रमकपणे जोखीम घेऊन आयसीआयसीआय बँक वाढवली होती. या बँकेत आयसीआयसीआय या ‘डीएफआय’ संस्थेचे विलीनीकरण झाले होते. हे जर केले नसते आणि आयसीआयसीआय बँक वेगाने वाढली नसती, तर या बँकेची अवस्था आयडीबीआय आणि आयएफसीआयसारखी झाली असती. यामुळे धोका पत्करून घेतलेला धाडसी निर्णय संस्थेच्या वाढीसाठी योग्य ठरला.

कामथ यांनी संस्थेमध्ये महिला वारसदार निर्माण केले. एक महिला निवृत्त झाल्या, दुसऱ्या महिला दुसऱ्या संस्थेत उच्चपदी गेल्या आणि तिसऱ्या मात्र सध्या अडचणीत आहेत.

कामथ यांच्यावर सरकारने नवीन ब्रिक्स विकास बँकेची जबाबदारी टाकली. अजूनपर्यंत संस्थेचा पाया भक्कम करून ती आणखी मोठी करायची हे काम बाकी आहे. कदाचित आणखी काही जबाबदाऱ्या कामथ यांना स्वीकाराव्या लागतील. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या दोन संस्थांमध्ये १९९१ च्या मुक्त आर्थिक धोरणाची सर्वात मोठी देण आणि जवळपास एकाच समयी स्थापित झाल्या असल्या तरी त्यांच्यात कडवी स्पर्धा आहे. एचडीएफसी बॅंकेत एचडीएफसी लिमिटेडचे विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, आयसीआयसीआय बॅंकेला मोठे होण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील, हे निश्चितच… कामथ यांचे नेतृत्व बँकेवर नसले तरी त्यांनी मागे सोडलेला वारसा नक्कीच कामी येईल.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:48 IST

संबंधित बातम्या