LIC Loses 43,000 Crore Due To IT Sector Stock Crash: निफ्टी आयटी निर्देशांकामध्ये २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वाधिक २१% टक्के घसरण झाली आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका एलआयसी आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडांना बसला आहे. यामुळे त्यांचे एकत्रित गुंतवणूक मूल्य फेब्रुवारी महिन्यात १.१८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
AMFI च्या आकडेवारीनुसार, जानेवारी अखेरीस म्युच्युअल फंडांची आघाडीच्या आयटी शेअर्समध्ये ३,५५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होती, परंतु आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्यामुळे २४ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य २,८०,९३३ कोटी रुपयांवर घसरले आहे, म्हणजेच चार आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूक मूल्यात ७४,६६६ कोटी रुपयांची घट झाली आहे.
एलआयसीला ४३ हजार कोटींचा फटका
एस इक्विटीकडून मिळालेल्या डिसेंबर-तिमाहीच्या शेअरहोल्डिंग माहितीनुसार, एलआयसीची कामगिरीही काही चांगली नसल्याचे समोर आले आहे. आघाडीच्या १० आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील एलआयसीची गुंतवणूक २,११,२५७ कोटी रुपयांवरून १,६७,९३९ कोटी रुपयांवर आली आहे, ज्यामुळे एलआयसीला ४३,३१८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
म्युच्युअल फंड आणि एलआयसी या दोन्हींचा हा तोटा या महिन्यात कमी झाला असेल किंवा त्यात आणखी वाढ झाली असेल. पण एएमसीसाठी, डेटा पुढील महिन्यात जारी केल्यानंतर आणि एलआयसीने एप्रिलमध्ये त्यांचा गुंतवणूक डेटा जाहीर केल्यानंतरच गुंतवणूकीतील तोटा कमी झाला आहे की वाढला आहे हे स्पष्ट होईल.
एलआयसीची गुंतवणूक कोणत्या कंपन्यांमध्ये?
एलआयसी आणि म्युच्युअल फंडांची आयटी क्षेत्रात इन्फोसिस आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. डिसेंबर तिमाहीत, एलआयसीची इन्फोसिसमध्ये ११.३%, टीसीएसमध्ये ५.३%, टेक महिंद्रामध्ये ११.५% आणि एलटीआयमाइंडट्रीमध्ये ९.६% गुंतवणूक होती. आणि शेअर बाजारात गेल्या महिन्याभरात याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे.
या महिन्यात इन्फोसिस २३%, टीसीएस १८%, तर एचसीएल टेक, पर्सिस्टंट सिस्टम्स, टेक महिंद्र, कोफोर्ज आणि एलटीआयमाइंडट्री या शेअर्समध्ये प्रत्येकी किमान २०% घसरण झाली आहे. तर निफ्टी आयटी निर्देशांक २१% टक्क्यांनी घसरला आहे.
एआयमुळे आयटी क्षेत्रात चिंता
कृत्रिम बुद्धिमत्तेतील (एआय) प्रगतीमुळे आयटी क्षेत्रातील काम आणि नोकऱ्या कमी होतील अशा चिंता जगभरात व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमजोर झाल्या आहेत, परिणामी जगभरातील सर्व आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.
असे असले तरी एआय आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये एआयमुळे नोकऱ्यांना फटका बसेल की नाही यावर मतमतांतरे आहेत. काहींना एआयमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे वाटते, तर काहीजण म्हणतात की एआय नोकऱ्या हिरावेल.

